पुढील तीन दिवस मुंबई तापणार; शनिवार, रविवार, सोमवारी पारा ३७ अंश सेल्सिअस पार जाणार

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मुंबईचा पारा चढा राहणार आहे.
(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील तापमानात घट झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, असे वाटत असतानाच पुन्हा एकदा मुंबईचा पारा चढा राहणार आहे. शनिवार, रविवार व सोमवारी मुंबईचा पारा ३७ अंश सेल्सिअसच्या पार जाणार असल्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दोन आठवड्यापूर्वी मुंबई, ठाणे, रायगडचा पारा ३९ अंश सेल्सिअस पार गेला होता. तापमानात वाढ झाल्याने अंगांची लाहीलाही झाली होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. तापमानात वाढ झाल्याने बाधित रुग्णांवर वेळीच उपचार करण्यासाठी पालिकेच्या केईएम, नायर, सायन व कूपर रुग्णालयात कोल्डरूम तयार करण्यात आले आहेत. उष्णतेच्या लाटेत प्रत्येक जण होरपळून निघाला असताना, मात्र मुंबईतील तापमानात अचानक घट झाल्याने मुंबईला काहीसा दिलासा मिळाला.

आता पुन्हा एकदा तापमानात वाढ होण्याचा अंदाज कुलाबा हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे एप्रिल अखेरीस वाढत्या तापमानामुळे मुंबईकरांचा घामटा निघणार आहे. दरम्यान, शनिवार, रविवार व सोमवारी पारा वाढणार असल्याने गरज नसल्यास दुपारी १२ ते सायंकाळी ४ यावेळेत घरातून बाहेर पडू नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे. पुढील पाच दिवस उत्तर भारतात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे मुंबईतील तापमानातही वाढ होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

हिट वेव्ह अशी तयार होते

उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने मुंबई व परिसरातील तापमानात वाढ होते. उत्तरेकडील वारे वाहू लागल्याने गरम हवा एकाच जागी रोखते आणि गरम हवा एकाच ठिकाणी जमा होते. गरम हवेला रोखण्यासाठी काही उपाय नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्यावर परिणाम

-हिट वेव्हमुळे मनुष्य व पक्ष्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो.

-उष्णतेची लाट शरीरातील पाणी कमी करते आणि थकावट, चक्कर येणे, डोके दुखणे, घाम येणे अशाप्रकारचा त्रास होतो.

-हिट वेव्हमुळे तणाव येतो, तसेच उष्णतेच्या लाटेमध्ये वाढ झाली तर फिट येणे, ताप येणे असा त्रास होऊ शकतो.

वातावरणीय बदलांमुळे पावसाचा अंदाज चुकतो

गेल्या काही वर्षांत वातावरणीय बदलांमुळे पाऊसही लहरी झाला आहे. दरवर्षी ११ जून रोजी पावसाचे आगमन होणार, असा अंदाज वर्तवण्यात येतो. परंतु वातावरणीय बदलांमुळे पावसाचा अंदाज चुकतो, असे कुलाबा हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in