'बॉम्बे'वरून मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका; "काहीजण आपल्या मुलांना..."

जितेंद्र सिंग यांना विरोध करताना राज ठाकरे यांनी "जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय." असं विधान केलं होतं. यावर राज ठाकरेंचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे.
'बॉम्बे'वरून मुख्यमंत्री फडणवीसांची राज ठाकरेंवर टीका; "काहीजण आपल्या मुलांना..."
Published on

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी मुंबई नामांतरावरून केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जितेंद्र सिंग यांच्यावर निशाणा साधत टीका केली होती. यामध्ये त्यांनी सरकारचाही उल्लेख केला होता. यावरून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार

जितेंद्र सिंग यांच्या विधानावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाने नामांतराची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शरद पवार गटाकडून पत्र पाठवण्यात आले होते. शहराची ओळख कायम ठेवण्यासाठी आणि मराठीची अस्मिता जपण्यासाठी हे नाव बदलणे आवश्यक असल्याचे शरद पवार गटाचे म्हणणे आहे. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले, की "आता आयआयटी बॉम्बेचे नाव आयआयटी मुंबई असे करण्यात यावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करणार आहोत."

मुंबई नाव करण्यामागे भाजपचा वाटा

याबाबत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "आमच्यासाठी बॉम्बे नाही तर ते मुंबईच आहे. बॉम्बेचे नाव मुंबई करण्यामागे भारतीय जनता पक्षाचा मोठा वाटा आहे. भाजप नेते रामभाऊ नाईक यांच्या पुढाकाराने ते शक्य झाले. बॉम्बेच्या खुणा मिटल्या पाहिजेत आणि सगळीकडे मुंबईच असलं पाहिजे."

काही लोक सोयिस्करपणे...

जितेंद्र सिंग यांना विरोध करताना राज ठाकरे यांनी "जितेंद्र सिंग यांचं विधान हे सरकारच्या मानसिकतेचं एक प्रतीक आहे असं स्पष्ट दिसतंय." असं विधान केलं होतं. यावर राज ठाकरेंचे नाव न घेता देवेंद्र फडणवीस म्हणाले, "काही लोक सोयिस्करपणे, आपल्या मुलांना ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेचे नाव बदलावे अशी विनंती करत नाहीत." फडणवीस यांच्या या टिकेमागे अमित ठाकरे यांच्या शाळेचा उल्लेख होता. कारण अमित ठाकरे यांचे शिक्षण बॉम्बे स्कॉटिश स्कूल येथे झाले आहे.

मनसेची भूमिका

२००९ मध्ये आलेल्या 'वेक अप सीड' या चित्रपटात 'मुंबई' ऐवजी 'बॉम्बे' शब्द वापरण्यात आला होता. त्यावर मनसेने आक्षेप घेतला होता. आता या प्रकरणावरून मनसेकडून आयआयटी मुंबईच्या गेटसमोर 'आयआयटी बॉम्बे' नाही, 'आयआयटी मुंबई'! अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. आता मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेवर राज ठाकरे काही उत्तर देतात का? याकडे अनेकांच्या नजर लागल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in