IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचे आणि त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आयआयटी बॉम्बेने म्हटले होते.
IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी
IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी
Published on

मुंबई : आयआयटी बॉम्बेतील २२ वर्षीय बीटेक विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेने मोठी कारवाई केली आहे. विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता (डीन) प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांचे तत्काळ निलंबित करण्यात आले असून, साहिलच्या मृत्यूबाबत चौकशी सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, साहिलच्या मृत्यूबाबत यापूर्वी जारी केलेल्या निवेदनाबद्दल आयआयटी बॉम्बेने माफी मागितली आहे.

साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन

साहिल वाकोडे हा एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिकत होता. शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी पवई येथील आयआयटी बॉम्बेच्या वसतिगृह क्रमांक ४ मधील खोलीत तो मृतावस्थेत आढळला. तो मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी होता.

मृत्यूपूर्वी काही तास आधी तो परीक्षा देत होता. परीक्षेदरम्यान त्याच्याकडे मोबाईल आढळल्याचे आणि त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड करून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केल्याचे आयआयटी बॉम्बेने म्हटले आहे. मात्र, साहिलविरोधात कोणतीही शिस्तभंगाची कारवाई सुरू करण्यात आली नव्हती, असे संस्थेने स्पष्ट केले होते. त्याचे समुपदेशन करण्यात आले असून, या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर परिणाम होणार नाही, असेही त्याला सांगण्यात आल्याचा संस्थेचा दावा आहे.

दरम्यान, साहिलच्या मृत्यूनंतर आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. संस्थेने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसह मानसिक आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी संस्थेसमोर १८ मागण्यांचे निवेदनही मांडले होते.

प्रा. दुल्ला यांच्यावर आरोप

साहिलच्या कुटुंबीयांनी प्रा. सूर्यनारायण दुल्ला यांच्यासह संस्थेतील इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. साहिलला मागील काही काळापासून त्रास देण्यात आल्याचा तसेच त्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. कुटुंबीयांनी जातीय भेदभाव आणि कथित अपमानास्पद वक्तव्यांचेही आरोप केले असून, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्याचे वृत्त आहे.

मात्र, या आरोपांची अद्याप चौकशी सुरू असून त्यावर अंतिम निष्कर्ष आलेला नाही. आयआयटी बॉम्बेनेही तपास पूर्ण होण्यापूर्वी घटनेपूर्वीच्या परिस्थितीबाबत निष्कर्ष काढणे अयोग्य असल्याचे म्हटले आहे.

संस्थेने आधीच्या निवेदनाबद्दल मागितली माफी

साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीबाबत आयआयटी बॉम्बेने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनातील काही वक्तव्यांबद्दल संस्थेने माफी मागितली आहे. तपास सुरू असताना, साहिलच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या घटनांशी संबंधित तपशील अधिकृत तपास प्रक्रियेतून निश्चित होण्यापूर्वीच त्याबाबत भाष्य करणे योग्य नव्हते, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.

प्रा. दुल्ला प्राध्यापक म्हणून कार्यरत राहणार

प्रा. दुल्ला यांचे निलंबन विद्यार्थी व्यवहार अधिष्ठाता या पदावरील भूमिकेच्या संदर्भात करण्यात आले आहे. ते एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून कार्यरत राहतील, अशी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील चौकशी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय घेतला जाणार आहे.

IIT Bombay संचालकांच्या राजीनाम्याची बातमी खोटी

दरम्यान, साहिलच्या मृत्यूनंतर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी बॉम्बेचे संचालक प्रा. शिरीष बी. केदारे यांनी राजीनामा दिल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. मात्र, आयआयटी बॉम्बेने ही माहिती स्पष्टपणे फेटाळून लावली आहे.

संस्थेने अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की, प्रा. शिरीष बी. केदारे यांनी संचालकपदाचा राजीनामा दिलेला नाही.

यंदाची तिसरी घटना

साहिलच्या मृत्यूची घटना यावर्षी आयआयटी बॉम्बे परिसरात नोंदवण्यात आलेली तिसरी आत्महत्येची घटना असल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये चिंता व्यक्त होत असून, साहिलच्या मृत्यूच्या परिस्थितीची स्वतंत्र आणि सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in