Mumbai : कोस्टल रोडवर वाजणार 'जय हो'ची धून; देशातील पहिला 'संगीतमय रस्ता' सुरु, काय आहे खास?

तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेला हा रस्ता देशातील पहिला मेलोडी रोड ठरला आहे. अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी या मेलोडी रोडचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. ११) अमरसन्स गार्डनजवळ केले.
Mumbai : कोस्टल रोडवर वाजणार 'जय हो'ची धून; देशातील पहिला 'संगीतमय रस्ता' सुरु, काय आहे खास?
(Photo-X/@CMOMaharashtra)
Published on

मुंबईतील कोस्टल रोडवर आता गाडी चालवताना एक खास अनुभव मिळणार आहे. या रस्त्यावरून योग्य वेगात गाडी चालवली तर 'स्लमडॉग मिलेनियर' या चित्रपटातील लोकप्रिय 'जय हो' या प्रसिद्ध गाण्याची धून ऐकू येणार आहे. तंत्रज्ञानाचा वापर करून विकसित केलेला हा रस्ता देशातील पहिला मेलोडी रोड ठरला आहे. अमरसन्स गार्डन ते ब्रिच कँडी या मेलोडी रोडचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. ११) अमरसन्स गार्डनजवळ केले.

म्युझिकल रोड कुठे आहे?

माहितीनुसार, ही खास संगीत स्ट्रिप नरीमन पॉइंट ते वरळी या दिशेच्या (नॉर्थबाउंड) मार्गावर बसवण्यात आली आहे. भुयारातून बाहेर पडल्यावर लगेचच ५०० मीटरच्या भागात ही स्ट्रिप आहे. रस्त्यावर खास प्रकारचे म्युझिकल ग्रूव्ह्स (स्ट्रिप्स) तयार करण्यात आले आहेत. जेव्हा वाहन ६० ते ७० किमी प्रतितास वेगाने या पट्ट्यावरून जाते, तेव्हा 'जय हो' गाण्याची धून ऐकू येते. वाहनचालकांना आधी सूचना मिळाव्यात म्हणून ५०० मी., १०० मी. आणि ६० मी. अंतरावर फलक लावण्यात आले आहेत.

भारतातील पहिलाच प्रयोग

'मेलोडी रोड' हा प्रकल्प सर्वप्रथम २००७ मध्ये जपानमध्ये सुरू झाला. त्यानंतर दक्षिण कोरिया, हंगेरी आणि यूएईमध्येही असे रस्ते तयार करण्यात आले. भारतातील हा पहिलाच प्रकल्प असून जगातील मोजक्या मेलोडी रोडपैकी एक आहे.

संकल्पना आणि अंमलबजावणी

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पाची संकल्पना माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मांडली होती. बृहन्मुंबई महापालिकेने (BMC) हा प्रकल्प प्रत्यक्षात साकारला आहे.

म्युझिकल रोडचे फायदे काय?

या मेलोडी रोडमुळे वाहनचालक ठराविक वेगात गाडी चालवतील. अतिवेग आणि अचानक ब्रेक लावण्याचे प्रकार कमी होतील. वाहतुकीचा प्रवाह अधिक सुरळीत राहील. तसेच ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक आनंददायी होईल, अशी प्रशासनाची अपेक्षा आहे.

कोस्टल रोड आधीच मुंबईसाठी महत्त्वाचा प्रकल्प आहे. आता या नव्या संकल्पनेमुळे प्रवास अधिक वेगळा आणि आकर्षक होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in