
दुबईत आज (दि. १४) होणाऱ्या आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामन्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आंदोलन छेडले. पक्षाच्या महिला आघाडीने मुंबईत या क्रिकेट सामन्याचा निषेध केला. या आंदोलनाला 'माझं कुंकू, माझा देश' असे नाव देण्यात आले आहे.
शनिवारी (दि. १३) झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना खेळण्याचा निर्णय हा देशभक्तीचा अपमान असल्याचे म्हटले होते. "सरकार राजकारण आणि व्यवसाय देशभक्तीत मिसळत आहे," असा आरोप करत ठाकरे यांनी महिला कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सिंदूर पाठवण्याचे आवाहन केले होते.
पंतप्रधान मोदी यांना पाठवले सिंदूर
त्यानुसार, शिवसेना भवन येथे महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी खासदार अनिल देसाई ह्यांच्याकडे देशाचे पंतप्रधान मोदी यांना कुंकू, सौभाग्याची ओटी व सिंदूर दिल्लीला पाठवण्यासाठी सुपूर्द केले.
नागरिकांच्या जीवापेक्षा पैशांना महत्त्व - असदुद्दीन ओवेसी
दरम्यान, AIMIM चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनीही भाजपवर टीका केली. त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीय नागरिकांचा बळी गेल्यानंतर पाकिस्तानविरुद्ध सामना खेळण्याचा निर्णय हा अमानवी असल्याचे म्हटले. “नागरिकांच्या जीवापेक्षा सामन्यातील पैशांना अधिक महत्त्व दिले जात आहे का?” असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित केला.
पहलगाम हल्ल्यानंतर आणि ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात उतरत आहे. विरोधकांनी बहिष्काराची मागणी केली असली तरी केंद्र सरकारने बहुराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास आक्षेप घेतलेला नाही.