मुंबईत राहणाऱ्या एका जपानी तरुणीने नव्याने सुरू झालेल्या मुंबई मेट्रो लाईन-३ (अक्वा लाईन) मधून केलेल्या पहिल्या प्रवासाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. या भूमिगत मेट्रोला तिने 'स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर धावणारी' अशी उपमा दिली आहे. हा व्हिडिओ नेटकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मुंबईत प्रवाशांसाठी सुरू झालेल्या या अत्याधुनिक मेट्रो मार्गिकेने आता नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे.
पहिला प्रवास आणि जपानी तरुणीचा अनुभव
व्हिडिओत ही तरुणी आनंदाने म्हणते, "माझ्यासोबत नवीन मुंबई मेट्रो लाईनवर पहिली सफर करा! अक्वा लाईन नुकतीच पूर्णपणे सुरू झाली आहे आणि ही मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन आहे." ती पुढे सांगते, "मी घरी जायचं ठरवलं होतं, पण गूगल मॅप्सवर कारने दीड तास लागेल असं दाखवलं. मग मी विचार केला, का नाही नवीन मेट्रो वापरून पाहूया!"
प्रवासादरम्यान ती मार्गाची सोय, आधुनिक रचना आणि स्वच्छतेचं कौतुक करत म्हणते, "मला जाणवलं की ही मेट्रो बांद्रा, बीकेसी आणि विमानतळ अशा सर्व महत्त्वाच्या ठिकाणांमधून जाते आणि खरं सांगायचं तर, मला असं वाटलं जणू मी परत जपानमध्ये आले आहे. स्वच्छ, सुरक्षित आणि वेळेवर धावणारी मेट्रो!"
पाहा व्हिडिओ -
महिलांसाठी विशेष सोयींचं कौतुक
ती पुढे मेट्रो स्थानकांच्या प्रशस्त रचनेचं, स्वच्छ वातावरणाचं आणि महिलांसाठी राखीव डब्याचं विशेष कौतुक करते. "ही सुविधा महिलांसाठी प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवते," असं ती म्हणते.
व्हिडिओत पुढे ती मरोळ स्थानकावर उतरताना दिसते. हे स्थानक मेट्रो लाईन-१ ला (घाटकोपर-वर्सोवा) जोडणारं इंटरचेंज असून शहरातील प्रवाशांसाठी हा महत्त्वाचा दुवा मानला जातो. तिच्यासोबत विजय नावाचा सहप्रवासीही होता. दोघे मिळून मुंबईच्या गर्दीच्या रस्त्यांमधून मरोळ स्थानकाकडे जाताना दिसतात. ती शेवटी म्हणते, "ज्या शहरात चांगली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि चालण्यासाठी सोयीस्कर रस्ते आहेत, ते शहर नक्कीच योग्य दिशेने जात आहे."
भूमिगत मेट्रो ३ ची पूर्ण मार्गिका आता प्रवाशांसाठी खुली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ ऑक्टोबर रोजी वरळी ते कफ परेड जोडणाऱ्या मेट्रो लाईन-३ च्या दुसऱ्या टप्प्याचं (फेज २बी) उद्घाटन केलं. यामुळे मुंबईची पहिली पूर्ण भूमिगत मेट्रो मार्गिका प्रवाशांसाठी खुली झाली. ही मार्गिका एकूण ३३.५ किलोमीटर लांबीची असून त्यात २७ स्थानकं आहेत, त्यापैकी २६ स्थानकं भूमिगत आहेत.
दररोज सकाळी ५:५५ ते रात्री १०:३० या वेळेत ही मेट्रो धावते. संपूर्ण प्रवास एका तासाच्या आत पूर्ण करता येतो. डिजिटल तिकीटिंग, मोफत वाय-फाय आणि मेट्रोकनेक्ट३ ॲपद्वारे मिळणारी रिअल-टाईम माहिती या सुविधांमुळे ही मेट्रो मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल घडवते आहे.