पश्चिम बंगालची 'झालमुरी' देशभर चर्चेत; मुंबईत कुठे मिळेल? काय आहे खास?

Bengal snack Jhalmuri : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान एका स्थानिक स्टॉलवर थांबून १० रुपयांची झालमुरी खाल्ल्यानंतर या स्नॅकची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली.
पश्चिम बंगालची 'झालमुरी' देशभर चर्चेत; मुंबईत कुठे मिळेल? काय आहे खास?
पश्चिम बंगालची 'झालमुरी' देशभर चर्चेत; मुंबईत कुठे मिळेल? काय आहे खास?'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

पश्चिम बंगाल निवडणुकांच्या जल्लोषात सध्या 'झालमुरी' या बंगाली स्ट्रीट फूडची जोरदार चर्चा रंगली आहे. कोलकात्याच्या स्ट्रीट स्टॉल्सवर सहज मिळणारा हा तिखट आणि चटकदार पदार्थ आता देशभर चर्चेत आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारादरम्यान एका स्थानिक स्टॉलवर थांबून १० रुपयांची झालमुरी खाल्ल्यानंतर या स्नॅकची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली. त्यानंतर झालमुरीची क्रेझ आणखी वाढली आहे.

मोदींचा हा साधा स्ट्रीट फूड स्टॉप सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनीही अनेक ठिकाणी झालमुरी वाटून आनंद साजरा केला. त्यामुळे 'झालमुरी' हा पदार्थ केवळ बंगालपुरता मर्यादित न राहता देशभर चर्चेचा विषय ठरला. मुंबईतही आता कोलकाता स्टाईल झालमुरी कुठे मिळते, याची उत्सुकता खाद्यप्रेमींमध्ये वाढली आहे.

काय आहे झालमुरी?

झालमुरी हा बंगालमधील लोकप्रिय स्ट्रीट स्नॅक आहे. 'झाल' म्हणजे तिखट आणि 'मुरी' म्हणजे कुरमुरे. कांदा, टोमॅटो, शेंगदाणे, भाजलेले चणे, मसाले, लिंबू आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोहरीच्या तेलाचा स्वाद यामुळे झालमुरीला वेगळी ओळख मिळते. हलका पण पोट भरेल असा हा पदार्थ ५ मिनिटांत तयार होतो.

मुंबईत कुठे खाल कोलकाता स्टाईल झालमुरी?

  • कांदिवली पूर्व - सिंगारावाला (SINGARAWALA) : कांदिवली पूर्वेतील हे ठिकाण कोलकाता स्टाईल झालमुरीसाठी ओळखले जाते. कमी किमतीत अस्सल बंगाली चव येथे चाखता येते.

  • मिरा रोड - कोजागोरी (Kojagori - Taste Of Kolkata) : मिरा रोडमधील हे ठिकाण बंगाली खाद्यप्रेमींसाठी खास आहे. येथे कोलकाता स्ट्रीट फूडची चव अनुभवता येते.

  • वांद्रे पश्चिम - 7th Street Chaat : वांद्रे येथील हे ठिकाण मोहरीच्या तेलाचा ठसका असलेली चटकदार झालमुरीसाठी प्रसिद्ध आहे.

झालमुरी इतकी खास का?

झालमुरीची खरी मजा तिच्या चवीत आणि टेक्स्चरमध्ये आहे. कुरमुऱ्याचा हलकासा कुरकुरीतपणा, कांदा-टोमॅटोचा फ्रेशनेस, मसाल्यांचा तिखटपणा आणि मोहरीच्या तेलाचा झणझणीत फ्लेवर यामुळे हा पदार्थ एकदम वेगळा लागतो. मुंबईच्या भेळपुरीसारखा दिसणारा हा पदार्थ चवीला मात्र पूर्णपणे वेगळा असतो.

झटपट आणि चटकदार असल्याने झालमुरी हा उन्हाळ्यातील परफेक्ट इव्हनिंग स्नॅक मानला जातो. कोलकात्याची अस्सल स्ट्रीट फूड चव अनुभवायची असेल, तर मुंबईतील या ठिकाणी झालमुरी नक्की ट्राय करा.

logo
marathi.freepressjournal.in