मुंबईच्या सांस्कृतिक जगतातील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा 'काळा घोडा कला महोत्सव' (Kala Ghoda Arts Festival-KGAF) हा शहराच्या वसाहतीकालीन इतिहासाशी आणि समकालीन कलात्मकतेशी घट्ट नाते सांगणारा उत्सव आहे. कला, वारसा आणि सर्जनशीलतेचा उत्सव साजरा करणाऱ्या या महोत्सवाचे यंदा २६वे पर्व आहे. शनिवार (दि. ३१ जानेवारी) ते रविवार (दि. ८ फेब्रुवारी) या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
नऊ दिवस चालणाऱ्या या महोत्सवात चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य, चित्रपट, कार्यशाळा, खाद्यसंस्कृती आणि सादरीकरणांचा संगम पाहायला मिळतो. दक्षिण मुंबईतील काळा घोडा परिसर हा या काळात एक ओपन-एअर सांस्कृतिक मंच बनतो, जिथे दररोज हजारो कला-प्रेमी उपस्थित राहतात.
'काळा घोडा’ नावामागील इतिहास
ब्रिटिश काळात सातवा किंग एडवर्ड यांचा काळ्या दगडाचा घोड्यावर बसलेला पुतळा या परिसरात उभारण्यात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर हा पुतळा १९६५ मध्ये हटवून भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात हलवण्यात आला. मात्र, पुतळा हटवूनही परिसराचे नाव ‘काळा घोडा’ असेच रूढ झाले.
२०१७ मध्ये काळा घोडा असोसिएशनने ‘The Spirit of Kala Ghoda’ असे नाव असलेली काळ्या घोड्याची शिल्पाकृती उभारून या भागाची सांस्कृतिक ओळख अधोरेखित केली.
महोत्सवाची सुरुवात
१९९९ मध्ये काळा घोडा असोसिएशन (KGA) या नागरिक, कलाकार, वास्तुविशारद आणि संवर्धनकर्त्यांच्या समूहाने महोत्सवाची सुरुवात केली. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वास्तू, संग्रहालये आणि सांस्कृतिक संस्थांकडे लोकांचे लक्ष वेधणे हा यामागचा उद्देश होता.
सुरुवातीला लहान स्वरूपात सुरू झालेला हा उपक्रम कालांतराने आशियातील 'सर्वात मोठ्या बहुविविध स्ट्रीट आर्ट महोत्सवांपैकी एक' म्हणून ओळखला जाऊ लागला. सर्वांसाठी मोफत असल्याने या महोत्सवात मोठ्या प्रमाणात कलाप्रेमींचा सहभाग असतो. या महोत्सवामुळे अनेकांना सांस्कृतिक व्यासपीठ मिळते.
जहांगीर आर्ट गॅलरी, छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय आणि हॉर्निमन सर्कल परिसर हा या काळात सांस्कृतिक केंद्र बनतो.
उत्सवाची नांदी
आज काळा घोडा कला महोत्सव हा मुंबईच्या बहुसांस्कृतिक (कॉस्मोपॉलिटन) आत्म्याचं प्रतीक म्हणून उभा आहे. सर्जनशीलता, सर्वसमावेशकता आणि शहराच्या समृद्ध इतिहासासोबतच समकालीन संस्कृतीचा सुंदर संगम साजरा करणारा हा उत्सव आहे.
काळा घोडा कला महोत्सवाला आशियातील सर्वात मोठा बहुविध (Multidisciplinary) कला महोत्सव म्हणून ओळखले जाते. दक्षिण मुंबईत दरवर्षी होणारा हा महोत्सव १९९९ मध्ये वारसा महोत्सव (Heritage Event) म्हणून सुरू झाला. आज तो केवळ मुंबईतीलच नव्हे, तर देश-विदेशातूनही मोठ्या संख्येने रसिकांना आकर्षित करतो.