Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार

एका व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक केल्याने कांदिवली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची बहीण सध्या फरार आहे.
Mumbai : कांदिवलीमध्ये ट्रेडिंगच्या बहाण्याने व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक; भावाला अटक, बहीण फरार
Published on

नव्या व्यवसायासाठी मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवत आर्थिक फसवणुकीचे प्रकार सध्या वाढत आहेत. असे असतानाच, मुंबईतील कांदिवली परिसरात कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचा दावा करत फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. एका फ्रीलान्स व्यावसायिकाची तब्बल ६९ लाखांहून अधिक रुपयांची फसवणूक करण्यात आल्याने या प्रकरणी कांदिवली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याची बहीण सध्या फरार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव जतीन कुमार उनाडकट असे असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. या फसवणूक प्रकरणातील सहआरोपी असलेली त्याची बहीण संगीता उनाडकट हिचा शोध सुरू असून, या दोघांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या फसवणुका केल्या आहेत का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

या प्रकरणातील तक्रारदार प्रेमकुमार वर्मा हे विरार येथे राहणारे फ्रीलान्स व्यावसायिक आहेत. २०१७ ते २०२३ या कालावधीत त्यांनी एका डायरेक्ट सेल्स एजन्सीत काम करत अनेकांना बहुराष्ट्रीय बँकांकडून वैयक्तिक कर्ज मिळवून देण्यास मदत केली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांनी संगीता उनाडकटला २५ लाख रुपयांचे कर्ज मिळवून दिले होते. याच काळात संगीताने प्रेमकुमार यांची ओळख तिचा भाऊ जतीन कुमार याच्याशी करून दिली. जतीन हा शेअर ट्रेडिंग आणि बल्क डीलिंगमध्ये कार्यरत असल्याचा दावा त्याने केला होता.

माहितीनुसार, जानेवारी २०२४ मध्ये नोकरी सोडल्यानंतर नव्या व्यवसायाच्या संधींचा शोध घेत असताना, जतीन आणि संगीता यांनी प्रेमकुमार यांना कांदिवलीतील सरोवर हॉटेल परिसरात भेटण्यास बोलावले. त्या भेटीत त्यांनी ‘बूम लिफ्ट’ म्हणजेच उंच ठिकाणी काम करण्यासाठी आवश्यक असलेली अवजड यंत्रे भाड्याने द्यायची किंवा विकायची हा व्यवसाय सुरू करण्याची योजना मांडली. या व्यवसायासाठी ३.५ कोटी रुपयांची गुंतवणूक आवश्यक असल्याचे सांगत, सुरुवातीला ९० लाख रुपये उभे करण्याची गरज असल्याचे नमूद केले.

जतीन कुमार याने स्वतःच्या नावावरील शेअर्स प्रेमकुमार यांच्या नावावर ट्रान्सफर करून, त्या शेअर्सच्या आधारे मोठ्या रकमेचे कर्ज मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनांवर विश्वास ठेवून प्रेमकुमार यांनी विरारमधील आपला फ्लॅट ८६ लाख रुपयांना विकला. जुलै ते ऑगस्ट २०२४ दरम्यान, शेअर्स ट्रान्सफर व कर्ज प्रक्रियेसाठी त्यांनी हप्त्यांमध्ये ८१ लाख रुपये जतीन कुमार याला दिले. यासंदर्भात दोघांमध्ये लेखी करारही करण्यात आला होता.

डेमो शेअर्सद्वारे फसवणूक

यानंतर जतीन कुमारच्या सांगण्यावरून प्रेमकुमार यांनी डिमॅट खाते उघडून त्याचे लॉगिन तपशील आरोपीकडे दिले. खासगी वित्तसंस्थेकडून २.८० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे स्क्रीनशॉट आरोपीने दाखवले. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या खात्यात कोणतीही रक्कम जमा झाली नाही. पोलिस तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, कोणतेही शेअर्स गहाण ठेवण्यात आले नव्हते. डिमॅट खात्यात दाखवलेले शेअर्स हे केवळ प्रॅक्टिस ट्रेडिंगसाठी वापरले जाणारे डेमो किंवा आभासी शेअर्स असल्याचे निष्पन्न झाले.

या संदर्भात जाब विचारला असता आरोपी भावंडांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. आरोपीने दिलेला सुरक्षा धनादेशही वटवला नाही. फक्त १.७७ लाख रुपये परत करण्यात आले असून उर्वरित ६९.१८ लाख रुपयांचा अपहार झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

पोलिसांची कारवाई

या प्रकरणी प्रेमकुमार वर्मा यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी फसवणूक व विश्वासघाताचा गुन्हा दाखल करत ७ जानेवारी रोजी जतीन कुमार उनाडकटला अटक केली आहे. फरार सहआरोपी संगीता उनाडकटचा शोध सुरू असून, या फसवणुकीत आणखी नागरिक बळी पडले आहेत का, याचाही सखोल तपास पोलिसांकडून केला जात आहे. लाख रुपयांची रक्कम अपहार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले.

प्रेमकुमार वर्मा यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी फसवणूक आणि विश्वासघाताचा गुन्हा दाखल करत ७ जानेवारी रोजी जतीन कुमार उनाडकटला अटक केली आहे. फरार सहआरोपीचा शोध सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणी बळी आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in