

मुंबईच्या कांदिवली-चारकोप परिसरात बुधवारी (दि. १९) दुपारी ४२ वर्षीय बिल्डरवर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत बिल्डर फ्रेंडी डिलीमा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधाराला अटक केली असून, मोटारसायकलवरून आलेल्या ३ हल्लेखोरांचा शोध अद्याप सुरू आहे. या थरारक घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहेत.
कशी अटक झाली?
पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीसह तपास करत, मुख्य सूत्रधार ३४ वर्षीय मुन्ना मयुद्दीन शेख याला अटक केली आहे. पोलीसांच्या अंदाजानुसार, शेखने संपूर्ण हल्ल्याची आखणी केली होती. तरीही, मोटारसायकलवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांचा शोध सुरू असून त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
नेमकी घटना
ही घटना बुधवारी दुपारी सुमारे २ वाजता फादर सुसाय स्कूलजवळ घडली. ४२ वर्षीय डिलीमा मित्राच्या दुकानातून बाहेर पडून कारकडे जात होता, तेव्हा मोटारसायकलवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेत स्थानिकांनी त्याला बोरिवलीमधील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये नेले. डॉक्टरांनी त्याला लागलेल्या गोळ्या काढल्या आहेत.
सीसीटीव्ही फुटेजमधील थरारक क्षण
फुटेजमध्ये दिसते की, फ्रेंडी डिलीमा आणि त्याचा मित्र पार्क केलेल्या कारकडे जात होते. त्या दरम्यान, हेल्मेट घातलेल्या एका हल्लेखोराने मोटारसायकलवरून येऊन डिलीमाच्या छातीत आणि पोटात जवळून दोन गोळ्या झाडल्या. हल्ला करून तो लगेच पळून जातो, तर त्याचे दोन साथीदार मोटारसायकलवर थांबलेले दिसतात.
पोलिसांच्या मते, हल्लेखोर काही मिनिटे परिसरात फिरत योग्य संधीची वाट पाहत होते. अनेक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत त्यांची हालचाल कैद झाली असून, त्यांचे पळण्याचे मार्ग तपासले जात आहेत.