
टेलिव्हिजनवरील कॉमेडी कार्यक्रम 'द कपिल शर्मा शो' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शो मध्ये मुंबईऐवजी ‘बॉम्बे’ असा उल्लेख केल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तीव्र आक्षेप घेतला असून कपिल शर्मालाच थेट इशारा दिला आहे. शोमध्ये आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये वारंवार ‘बॉम्बे’चा उल्लेख होतो, यावर मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. त्यांनी कपिल शर्माला मुंबई हा उल्लेख केला नाहीतर आंदोलन करण्याचा विनंती वजा इशारा दिला आहे.
जर मुंबई उल्लेख केला नाहीतर...
अमेय खोपकर यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत म्हटले, की ''बॉम्बेचे मुंबई अधिकृत नामकरण होऊन ३० वर्षे झाली, तरी अजूनही बॉलिवूड मधील कपिल शर्मा शो यात सेलिब्रिटी गेस्ट, दिल्लीस्थित राज्यसभा खासदार, शो अँकर आणि अनेक हिंदी चित्रपटात सर्रास बॉम्बे हा उल्लेख होत आहे. १९९५ महाराष्ट्र शासन व १९९६ मध्ये केंद्र शासनाची अधिकृत मान्यता मिळून चेन्नई, बेंगळुरू, कोलकाताच्याही आधी मुंबई झाले आहे. तरी याचा मान राखून मुंबई उल्लेख करावा हा विनंती वजा इशारा देण्यात येत आहे.'' जर यामध्ये बदल झाला नाही, तर मनसे स्टाईलने शोच्या शूटिंग स्पॉटवर जाऊन आंदोलन करणार तसेच शूटिंग बंद पाडणार, असा इशाराही खोपकर यांनी दिली.
आमच्या शहराचं नाव मुंबई आहे, बॉम्बे नाही
अमेय खोपकर यांनी माध्यमांवर प्रतिक्रिया देताना सांगितले, ''गेल्या काही दिवसांपासून आम्ही कपिल शर्माचा नवीन शो सुरू झाल्यापासून बघतोय, सतत मुंबईचा उल्लेख 'बॉम्बे बॉम्बे' केला जात आहे. तिथे येणारे सेलिब्रेटी असतील, अँकर असतील, कपिल शर्मा किंवा इतर असतील. ध्यानात ठेवावं आमच्या शहराचं नाव मुंबई आहे, बॉम्बे नाही!
या शहराने तुम्हाला पोसलंय
अन्य शहरांच्या नावाचा उल्लेख करत खोपकर म्हणाले, ''इतर वेळेला बोलताना तुम्ही बरोबर बंगळुरू, चेन्नई अशी नावे वापरता. जेव्हा तुम्हाला मुंबई बद्दल बोलायचं असेल तर सतत बॉम्बे बॉम्बे उच्चार करता. याचा निषेध करतो. आज तर मी विंनती करतोय. याच्यापुढे तुमच्या शो मध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे होता कामा नये. कपिल शर्माने पण हे लक्षात ठेवावं. उद्या कपिल शर्माला टपील शर्मा संबोधित केलं तर चालेल का? मुंबई आमच्या भावना आहेत. त्याला ठेच पोहचू नयेत. एकूण तीस वर्षापूर्वी या शहराचं नाव मुंबई झालं आहे. तुम्हाला या शहराने पोसलंय. तुमचीही कर्मभूमी आहे. तुम्हाला जरा पण शरम नाही वाटत तुम्हाला या शहाराने पोसलंय! त्याचा उच्चार आहे तो करावा. इतर राज्यात जाऊन हिंमत दाखवा. तिथे तुम्ही बरोबर त्या शहरांची नावे घ्याल.''
खासकरून कपिल शर्माला इशारा
अमेय खोपकर यांनी विशेष करून कपिलला इशारा देताना म्हटले, ''लक्षात ठेवा मुंबईचा सन्मान केलाच पाहिजे. यापुढे तुमच्या शो मध्ये, चित्रपटांमध्ये, ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि खास करून कपिल शर्मा शो मध्ये मुंबई शहराचा उल्लेख मुंबईच झाला पाहिजे.'' मनसेने यासंदर्भात शोच्या टीमलाही पत्र दिले आहे. जर बदल झाला नाही तर शोच्या शूटिंग स्पॉटवर आंदोलन करून शूटिंग बंद पाडू, असा इशारा खोपकर यांनी दिला आहे.