

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे अत्यल्प, अल्प व मध्यम उत्पन्न गटाकरिता प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावर घरांची विक्री करण्यासाठी लॉटरी जाहीर केली आहे. या लॉटरीतील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत विरार-बोळींज, खोणी-कल्याण, शिरढोण-कल्याण, गोठेघर-ठाणे, भंडार्ली-ठाणे येथे उपलब्ध असलेल्या घरांच्या विक्रीत वाढ व्हावी व या गृहनिर्माण प्रकल्पांतील घरांबाबत सर्वसामान्य नागरिकांना माहिती व ऑनलाईन अर्ज नोंदणीबाबत मार्गदर्शनासाठी २ ते ११ डिसेंबर या कालावधीत व्यापक मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कोंकण मंडळाचे मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिली.
म्हाडा कोंकण मंडळाने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर घरांच्या विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरील घरांच्या ऑनलाईन विक्रीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला ११ ऑक्टोबरपासून प्रारंभ झाला आहे. या जाहिरातीमधील घरांच्या सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ठिकठिकाणी २९ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सवर मंडळाचा एक कर्मचारी नियुक्त करण्यात आला आहे. सर्वसामान्यांसाठी उपलब्ध असलेल्या सदनिकांची माहिती सामान्य जनतेला व्हावी यासाठी ठिकठिकाणी माहितीपत्रक वाटप व पथनाट्य सादरीकरण केले जात असल्याचे गायकर म्हणाल्या.
गायकर म्हणाल्या की, वसई विरार महानगरपालिका, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, पालघर या महानगरपालिकांच्या कार्यालयात स्टॉल उभारण्यात आले आहेत. पालघर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात व ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातही मंडळातर्फे स्टॉल लावण्यात आले आहेत. वसई, उल्हासनगर, पालघर, कल्याण येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तसेच अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात सदर स्टॉल आहेत. महापे एमआयडीसीमधील प्रशासकीय अधिकारी कार्यालयातही योजनेबाबत माहिती देणारे स्टॉल आहेत.
योजनांचा तपशील
विरार बोळींज १७४ (पीएमवाय)
विरार बोळींज ४,१६४
खोणी-कल्याण २,६२१ (पीएमवाय)
शिरढोण-कल्याण ५,७७४ (पीएमवाय)
गोठेघर-ठाणे ७०१ (पीएमवाय)
भंडार्ली-ठाणे ६१३ (पीएमवाय)
एकूण १४,०४७