Lalbaugcha Raja 2026 : महाकाय त्रिशूळ अन् मंदिराचे विशाल प्रवेशद्वार; लालबागच्या राजाच्या दरबाराची पहिली झलक, पाहा Video

मंडळाकडून यंदाच्या अंतिम थीमची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रिशूळामागचे नेमके गूढ काय, याची उत्सुकता भाविकांमध्ये वाढली आहे.
Lalbaugcha Raja 2026 : महाकाय त्रिशूळ अन् मंदिराचे विशाल प्रवेशद्वार; लालबागच्या राजाच्या दरबाराची पहिली झलक, पाहा Video
Lalbaugcha Raja 2026 : महाकाय त्रिशूळ अन् मंदिराचे विशाल प्रवेशद्वार; लालबागच्या राजाच्या दरबाराची पहिली झलक, पाहा Video(व्हायरल व्हिडीओतून घेतलेले स्क्रीनशाॅट्स)
Published on

मुंबई : गणेश चतुर्थीला अवघा आठवडा शिल्लक असताना मुंबईतील गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा सर्वाधिक उत्सुकता आहे ती लालबागच्या राजाच्या भव्य दरबाराची. मंडळाकडून यंदाची थीम आणि सजावट अद्याप गुप्त ठेवण्यात आली असली, तरी सोशल मीडियावर समोर आलेल्या काही व्हिडीओंमधून लालबागच्या राजाच्या मंडपाची पहिली झलक पाहायला मिळत आहे. भव्य मंदिररचना, विशाल प्रवेशद्वार आणि शिखरावर उभारण्यात आलेला महाकाय त्रिशूळ यामुळे यंदाची सजावट भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

मंदिराच्या धर्तीवर भव्य मंडप

समोर आलेल्या व्हिडीओंनुसार, यंदाचा लालबागच्या राजाचा मंडप भव्य मंदिराच्या धर्तीवर साकारला जात असल्याचे दिसत आहे. मंडपाच्या प्रवेशद्वारावर मंदिरशैलीतील विशाल रचना उभारण्यात आली असून, नक्षीदार स्थापत्य आणि मोठ्या सजावटीच्या घटकांमुळे संपूर्ण परिसराला मंदिराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

महाकाय त्रिशूळामुळे चर्चेला उधाण

या संपूर्ण रचनेतील सर्वाधिक लक्षवेधी ठरत आहे ते शिखरावर उभारण्यात आलेले भव्य त्रिशूळ. या त्रिशूळामुळे यंदाच्या थीमचा संबंध भगवान शंकराशी असू शकतो, अशी चर्चा सुरू झाली आहे. मात्र, मंडळाकडून यंदाच्या अंतिम थीमची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रिशूळामागचे नेमके गूढ काय, याची उत्सुकता भाविकांमध्ये वाढली आहे.

लालबागचा राजा गल्लीही उजळणार

'लालबागचा राजा' गल्लीच्या परिसरातही मोठ्या प्रमाणावर काम सुरू असल्याचे व्हिडीओंमधून दिसत आहे. या भागात मोठी छताची रचना उभारण्यात आली असून, आकर्षक प्रकाशयोजनेचे कामही सुरू आहे. गणेशोत्सवादरम्यान लाखो भाविकांची गर्दी होणाऱ्या या परिसराला यंदा विशेष भव्य रूप मिळणार असल्याचे दिसत आहे.

अंतिम थीम अजूनही पडद्याआड

लालबागचा राजा मंडळाची थीम दरवर्षी उत्सव सुरू होईपर्यंत गुप्त ठेवण्याची परंपरा आहे. यंदाही ही गुप्तता कायम ठेवण्यात आली आहे. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडीओंमुळे भाविकांना सजावटीची काहीशी झलक मिळाली आहे. मंदिररचना आणि महाकाय त्रिशूळानंतर आता अंतिम थीममध्ये नेमकं काय पाहायला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

१४ सप्टेंबरला गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबईचा लाडका 'लालबागचा राजा' आपल्या भव्य रूपात कधी समोर येणार, याची भाविक आतुरतेने वाट पाहत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in