
मुंबईतील गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) शिरोमणी मानला जाणारा लालबागचा राजा यंदा शनिवार, ६ सप्टेंबर रोजी भाविकांना निरोप देणार आहे. ११ दिवसांच्या जल्लोषपूर्ण उत्सवानंतर लाखो भक्तांच्या उपस्थितीत ही भव्य मिरवणूक पार पडणार आहे. दरवर्षीप्रमाणेच, लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक ही मुंबईतील सर्वांत लांब आणि सर्वांत प्रतिष्ठित मानली जाते. ही मिरवणूक बहुधा २४ तासांहून अधिक काळ चालते. पहाटे लालबाग येथील मंडपातून मूर्ती बाहेर काढल्यानंतर 'गणपती बाप्पा मोरया'च्या गजराने परिसर दुमदुमून जातो. ढोल-ताशांच्या गजरात, भक्तिगीतांच्या स्वरात आणि हजारो अनवाणी चालणाऱ्या भाविकांच्या उपस्थितीत ही विसर्जन मिरवणूक पुढे सरकते. या आपल्या लाडक्या नवसाला पावणाऱ्या राजाचे शेवटचे दर्शन पुढील टप्प्यात घेऊ शकता.
विसर्जन मार्गावरील प्रमुख टप्पे
लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन (पश्चिम) : लालबाग उड्डाणपुलाखाली भाविकांचा पहिला निरोप.
भायखळा स्टेशन (पश्चिम) : डेलिसल रोडपासून S-ब्रिज ओलांडत मूर्तीचा पुढील प्रवास.
हिंदुस्तान मशीद, भायखळा : सांप्रदायिक सौहार्दाचे प्रतीक मानला जाणारा हा थांबा. येथे मशिदीच्या समिती सदस्यांकडून दरवर्षी मूर्तीचे स्वागत केले जाते.
भायखळा अग्निशमन दल : अग्निशमन दलाच्या जवानांकडून लालबागच्या राजाला विशेष श्रद्धांजली वाहण्यात येते. मेगा अग्निशमन केंद्रातील सर्व वाहनांकडून गणेशमूर्तीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सायरन वाजवून श्रद्धांजली वाहण्यात येते.
नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक) : रंगेबिरंगी विद्युत रोषणाई आणि भाविकांच्या गर्दीचा मोठा टप्पा
गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र : गजबजलेल्या बाल्कनी आणि गल्ल्यांसह ऐतिहासिक परिसर.
ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) : येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत मिरवणूक शेवटच्या टप्प्याकडे जाते.
गिरगाव चौपाटी : 'पुढच्या वर्षा लवकर या' म्हणत दुसऱ्या दिवशी पहाटे अरबी समुद्रात बाप्पाला शेवटचा निरोप दिला जातो.
ही मिरवणूक केवळ धार्मिक कार्यक्रम नसून मुंबईच्या सांस्कृतिक विविधतेचा उत्सव मानला जातो. मार्गभर विविध मंडळे अल्पोपहार, पाणी व सरबताचे स्टॉल उभारतात. स्वयंसेवकांकडून वैद्यकीय मदत व प्रथमोपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. गर्दी नियंत्रणासाठी मुंबई पोलिसांकडून हजारो जवान तैनात राहतील, तसेच वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात येणार आहेत.
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीच्या तयारीसाठी चरणस्पर्शाची रांग गुरुवारी (दि.४) रात्री १२ वाजताच बंद करण्यात आली आहे. तर, मुखदर्शनाची रांग आज (दि.५) रात्री १२ वाजता बंद करण्यात येणार आहे, अशी माहिती लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दिली आहे.