Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात मार्गस्थ झाली.
Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी
Published on

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने लालबागचा राजा गणपतीच्या विसर्जनाची मिरवणूक मोठ्या जल्लोषात मार्गस्थ झाली. पहाटेच गिरगाव चौपाटी येथे लालबागच्या राजाचे विसर्जनासाठी आगमनही झाले. मात्र, यंदा विसर्जनासाठी खास गुजरातहून आणण्यात आलेल्या आधुनिक तराफ्यामुळे विसर्जन वेळेत पार पडेल का? याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.

आधुनिक तराफ्याचा पहिलाच वापर

या वर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी प्रथमच मोटारीकृत तराफा (motorized raft) वापरण्याची योजना आखण्यात आली होती. हा तराफा समुद्रात मूर्ती सुरक्षितपणे नेण्यासाठी बनवला गेला असून, मोठ्या मूर्तीला स्थिरता देण्यासाठी विशेष रचना करण्यात आली आहे.

विसर्जनात अडचणी

मात्र, समुद्रकिनारी विसर्जनावेळी मूर्ती तराफ्यावर चढवण्यात तांत्रिक अडचणी येत असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या भरतीची वेळ असल्याने तराफ्यावर मूर्ती बसवणे अधिक कठीण होत आहे. त्यामुळे विसर्जनाची प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली आहे.

कोळी बांधवांचे प्रयत्न सुरू

परंपरेप्रमाणे कोळी बांधव मूर्ती समुद्रात काही अंतरापर्यंत घेऊन गेले आहेत. आता भरती ओसरल्यानंतर, म्हणजेच ओहोटीच्या वेळी मूर्ती तराफ्यावर व्यवस्थित चढवून विसर्जन करण्यात येईल, अशी चर्चा सुरू आहे.

भक्तांमध्ये उत्सुकता

राज्यभरातून लाखो भाविक लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. विसर्जनाला विलंब झाल्याने गिरगाव चौपाटी परिसरात तसेच विसर्जन मार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.

logo
marathi.freepressjournal.in