

देवश्री भुजबळ / मुंबई :
बॉम्बे हायकोर्टातील एका वकिलाने मुंबई महानगरपालिका आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) कायदेशीर नोटीस पाठवून पूर्वेकडील फ्रीवेच्या उड्डाणपूल विस्तारासाठी सुमारे ७०६ झाडे तोडण्याचा आणि पुनर्लागवडीचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.
ॲडव्होकेट सागर देवरे यांनी २३ ऑक्टोबर रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये चेतावणी दिली आहे की, नागरिकांच्या आक्षेपांकडे दुर्लक्ष करून आणि मुंबईच्या हरित वारशाचे रक्षण करण्याच्या सार्वजनिक हिताच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष झाल्यास ते राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे दाद मागतील.
एमएमआरडीएचा २६८२ कोटी रुपयांचा हा प्रकल्प घाटकोपरच्या छेडा नगरपासून ठाण्याच्या आनंद नगरपर्यंत सुमारे १३ किमी लांबीचा उड्डाणपूल बांधण्याचा आहे. या प्रकल्पांतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावरील ७०६ झाडांवर परिणाम होणार आहे. त्यात विक्रोळी परिसरातील टॅबेबुइया रोजिया (पिंक ट्रम्पेट) या फुलझाडांचाही समावेश आहे. यापैकी ३१५ झाडे कायमस्वरूपी तोडली जाण्याची शक्यता आहे, तर उर्वरित झाडांची पुनर्लागवड केली जाणार आहे. मुंबईकरांनी मोठी झाडे तोडण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला असून, रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे.
विक्रोळीकर विकास मंचचे संजय येवले म्हणाले, “महानगरपालिकेने या महिन्याच्या सुरुवातीला सूचना लावून सूचना/आक्षेप मागवले होते. आम्ही आमचे ठोस आक्षेप नोंदवले आहेत आणि स्तंभांची जागा बदलणे, उड्डाणपुलाचा मार्ग बदलणे किंवा पर्यायी मार्ग शोधणे अशा उपायांचा विचार करावा, परंतु झाडे वाचवावीत, अशी मागणी केली आहे. आता आम्ही मुंबई मनपाच्या सार्वजनिक सुनावणीची तारीख जाहीर होण्याची वाट पाहत आहोत.’ काही रहिवाशांनी निदर्शनास आणले की, बीएमसीच्या नोटीसमध्ये ७९५ झाडे प्रभावित होतील, असे म्हटले आहे, तर एमएमआरडीएचा दावा ७०६ झाडांचा आहे. अॅडव्होकेट देवरे म्हणाले, ‘मुंबई मनपा आणि एमएमआरडीएचा निर्णय पर्यावरणीय सावधगिरीच्या तत्त्वाचे तसेच ‘आरोग्यदायी पर्यावरणाचा अधिकार’ या घटकात्मक तत्त्वाचे उल्लंघन करतो. तसेच, पर्यायांचा पुरेसा विचार करण्यात अपयश आले आहे. पुनर्लागवड केलेल्या झाडांचा टिकाव दर आधीच अत्यल्प आहे आणि अधिकाऱ्यांनी पर्यावरणीय परिणामांचा योग्य विचार केलेला नाही.’
दरम्यान, एमएमआरडीएने अलीकडील सोशल मीडिया पोस्टमधून छेडा नगर–आनंद नगर उड्डाणपूल प्रकल्पाद्वारे “हरित जबाबदारीसह विकास” या वचनबद्धतेची पुनरावृत्ती केली आहे. मुंबईतील सर्वाधिक गर्दीच्या वाहतुकीच्या ठिकाणांपैकी एक ठिकाण सुकर करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प राबवला जात असून, शहराच्या हरित पट्ट्याचे संरक्षण आणि वाढ यासाठी ठोस उपाययोजना केल्या जात आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
एमएमआरडीएने आपल्या अधिकृत ‘X’ हँडलवर लिहिले, “प्रतिपूरक वृक्षारोपण योजनेअंतर्गत ४१७५ नवीन झाडे लावली जातील, ज्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास आणि पर्यावरण संरक्षण हातात हात घालून चालेल. याशिवाय, विद्यमान ९४९ झाडे कायम ठेवली जातील आणि ३८६ झाडांची तज्ज्ञांच्या देखरेखीखाली नवीन ठिकाणी काळजीपूर्वक पुनर्लागवड केली जाईल.’