मोठी बातमी! मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास थेट मेट्रोने; ३५ किमीच्या प्रकल्पाला सरकारची मंजुरी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या ३५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.
मोठी बातमी! मुंबई ते नवी मुंबई विमानतळापर्यंतचा प्रवास थेट मेट्रोने; ३५ किमीच्या प्रकल्पाला सरकारची मंजुरी
Published on

मुंबई आणि नवी मुंबईला थेट जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी मेट्रो मार्गिका क्रमांक ८ला मंगळवारी (दि. २७) हिरवा कंदील मिळाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या ३५ किलोमीटर लांबीच्या मेट्रो प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली.

या मेट्रो मार्गामुळे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (CSMIA) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (NMIA) पर्यंतचा प्रवास अधिक वेगवान आणि सोयीस्कर होणार आहे. यामुळे मुंबईतील दोन्ही महत्त्वाच्या विमानतळांदरम्यानची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारणार आहे.

३८८ कोटींचा अंदाजे खर्च

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या माहितीनुसार, मुंबई-नवी मुंबई मेट्रो लाईन ८ साठी सुमारे ३०.७ हेक्टर भूसंपादन आवश्यक असून, त्यासाठी अंदाजे ३८८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. संपूर्ण मेट्रो प्रकल्पाचा एकूण अपेक्षित खर्च १८,००० कोटी रुपये इतका आहे.

मुंबई-नवी मुंबई मेट्रो लाईन ८ ची ठळक वैशिष्ट्ये

  • मेट्रो मार्गाची एकूण लांबी : ३५ किमी

  • ९.२५ किमी भूमिगत (Underground) आणि २४.६३ किमी उन्नत मार्ग

  • एकूण २० स्थानके - ६ भूमिगत, १४ उन्नत (Elevated)

  • CSMIA टर्मिनल २ ते घाटकोपर (पूर्व) दरम्यान भूमिगत मेट्रो

  • घाटकोपर (पश्चिम) ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ दरम्यान उन्नत मार्ग

  • दोन स्थानकांमधील सरासरी अंतर १.९ किमी

मुख्यमंत्र्यांचे निर्देश

कोणताही पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी भूसंपादन आणि सर्व आवश्यक परवानग्या पूर्ण कराव्यात, तसेच भूसंपादनानंतर तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करावा, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

logo
marathi.freepressjournal.in