

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपप्रणीत महायुतीकडून मोठा धक्का बसलेल्या विरोधी महाविकास आघाडीसाठी, मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका ही खरी कसोटी ठरणार आहेत. राजकीय निरीक्षकांच्या मते, या निवडणुका जणू लघु विधानसभा निवडणूक मानल्या जात आहेत.
ग्रामीण भागातील निवडणुकांवर स्थानिक समीकरणांचा प्रभाव अधिक असला, तरी त्या पक्षांची तळागाळातील ताकदही दाखवून देतात. या पार्श्वभूमीवर अलीकडील निकालांनी, लहान शहरे आणि निमशहरी भागांत महायुतीच्या मजबूत संघटनात्मक यंत्रणेला तोंड देण्यात विरोधकांना येणाऱ्या अडचणी अधोरेखित झाल्या आहेत, असे निरीक्षकांचे मत आहे. या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांत महायुतीने २०७ नगराध्यक्षपदांवर विजय मिळवला.
यामध्ये भाजपने सर्वाधिक ११७ नगराध्यक्ष पदे जिंकली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ५३, तर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने ३७ पदे मिळवली. याउलट, विरोधी मविआची एकत्रित संख्या केवळ ४४ वरच थांबली. त्यात काँग्रेसने २८, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) ने ७ तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ९ नगराध्यक्ष पदे जिंकली.
राजकीय विश्लेषकांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत महायुतीने नोव्हेंबर २०२४ च्या विधानसभा निवडणुकांतील भव्य यशाचीच पुनरावृत्ती केली आहे. आता मविआसमोर १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या मुंबईसह २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. विशेषतः संकटात सापडलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसाठी मुंबई हा आपला ‘किल्ला’ टिकवणे हे मोठे आव्हान ठरणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेची कडवी टक्कर त्यांना द्यावी लागणार आहे. मुंबईसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील (मनसे) बहुप्रतीक्षित युतीची घोषणा २४ डिसेंबर रोजी होऊ शकते, असा संकेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला आहे.
भाजप नेते अमित साटम यांनी उद्धव आणि राज ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीचा निवडणूक निकालांवर काहीही परिणाम होणार नसल्याचे म्हटले आहे.
काँग्रेसने आधीच शहरात स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. तर मविआमधील दुसरा घटक पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), मुंबईच्या राजकारणात तुलनेने दुय्यम भूमिकेत आहे.
काँग्रेससमोर अडचणी
अनेक भागांत मजबूत स्थानिक नेतृत्वाची साखळी नसणे
तळागाळात आघाडीतील भागीदारांशी समन्वयाचा अभाव
स्वतंत्र आणि ठळक राजकीय कथानक मांडण्यात येणारी अडचण
विदर्भातील काही भागांत तसेच मराठवाड्यातील काही क्षेत्रांत मिळालेल्या मर्यादित यशामुळे काँग्रेस काहीशी आत्मविश्वासात आहे. पक्षाने ४१ नगराध्यक्ष पदे आणि काँग्रेसच्या चिन्हावर १,००० हून अधिक नगरसेवक पदे जिंकली असल्याचा दावा केला आहे.