

कोलकता ते मुंबई दरम्यान प्रवास करत असताना एअर इंडियाच्या विमानात केवळ मराठी भाषा बोलण्याने एका महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मूळच्या बंगाली पण मराठी भाषेचा अभिमान बाळगणाऱ्या मुग्धा मजुमदार या महिलेला युट्युबर माही खानने सोशल मीडियावर लक्ष्य करत ट्रोलिंगचा भडका उडवला होता. केवळ मराठीत बोलल्यामुळे या महिलेचा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करत तिची बदनामी करण्यात आली. यामुळे मजुमदार यांना नोकरी गमवावी लागली, धमक्यांचा वर्षाव सहन करावा लागला. मात्र, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणी ठाम भूमिका घेतल्यानंतर अखेर माही खानचा 'माज उतरला' आणि त्याने मराठी जनतेची माफी मागितली आहे.
नेमकं काय घडलं विमानात?
मुग्धा मजुमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये त्या चहा पीत असताना पुढच्या सीटवर बसलेल्या युट्युबर माही खानने अचानक आपली सीट मागे घेतली. त्यामुळे त्यांच्या हातातला चहा आणि पुढ्यातील जेवण सांडलं. त्यांनी साधं 'भाऊ, हळू हळू...' असं मराठीत म्हटल्यावर माही खानला संताप आला आणि त्याने या महिलेशी वाद घालायला सुरुवात केली. एवढंच नाही, तर त्याने या प्रसंगाचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला. त्या व्हिडिओमध्ये मजुमदार यांना केवळ मराठी बोलल्यामुळे लक्ष्य करण्यात आलं. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर महिलेला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ह्युंदाई कंपनीत कार्यरत असलेल्या मजुमदार यांना नोकरी सोडावी लागली. फोनवरून धमक्या, अश्लील भाषा आणि भयंकर म्हणजे बलात्काराच्याही धमक्या मिळाल्याचं त्यांनी सांगितलं.
मनसेच्या कार्यालयात कोंबडा बनवू - अविनाश जाधव
पीडित महिला मुग्धा मजुमदार यांनी ठाण्यात मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेतली आणि आपली व्यथा सांगितली. त्यानंतर अविनाश जाधव यांनी तडकाफडकी भूमिका घेत माही खानला इशारा दिला. “हा माही खान यूट्यूबवर सतत व्हिडिओ बनवत आहे. त्या भिकरड्याला मराठीवर काही प्रेम नाहीये. त्याला Viewers वाढत आहेत. म्हणून करतोय. मी हे खात्रीने सांगतो. याला आम्ही सोडणार नाही. एक बंगाली बाई मराठी बोलू शकते. तुम्ही एवढे वर्ष मुंबईत राहता. तुमचा बाप, आजोबा यांना आम्ही पोसलं. त्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल इथे मराठीत बोललं जाणार नाही. तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार हा माझा शब्द आहे. नाहीतर मी माझं नाव बदलेन. हा भिकारडा थोडेसे पैसे कमवण्यासाठी या बाईचं काम बंद केलं. याच्या मागे हात धुवून लागा. याची पण रोजी रोटी बंद झाली पाहिजे. याला मी शोधणार आणि मनसेच्या कार्यालयात याला कोंबडा बनवून बसवलं नाही ना तर अविनाश जाधव माझं नाव नाही" असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
अविनाश जाधव यांनी सर्व मराठी भाषाप्रेमींना आवाहन केलं की, माही खानच्या सर्व सोशल मीडिया हँडल्स आणि युट्युब चॅनेलला रिपोर्ट करा. हा भिकारडा केवळ पैसा कमवण्यासाठी हे करत असल्याचे त्यांनी म्हंटले.
घाबरून अखेर माही खानचा माफीनामा
मनसेच्या इशाऱ्यानंतर अवघ्या २४ तासांतच माही खानचा सूर बदलला. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली. त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो “तीन दिवसांपूर्वी जो व्हिडिओ टाकला होता, तो मी काढून टाकला आहे. कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता. मी कोणत्याही भाषेविरोधात नाही. माझ्या व्हिडिओमुळे कुणाला वाईट वाटलं असेल तर मी माफी मागतो. मी मुंबई येत-जात असतो...मुंबई मेरी जान है...जय महाराष्ट्र!”