मराठा आरक्षणासाठी बेमुदत आंदोलनासाठी मनोज जरांगे पाटील अखेर मुंबईत दाखल झाले आहेत. त्यांनी आझाद मैदानात उपोषणाला सुरुवात केली आहे. न्यायालयाने त्यांना मर्यादित कार्यकर्त्यांसह केवळ एका दिवसासाठी आंदोलनाची परवानगी दिली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांची संख्या ५ हजारांच्या आत ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम आहेत. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखो मराठा आंदोलक संघटित झाले आहेत.
कार्यकर्त्यांची घोषणा व उत्साह
'चलो मुंबई'च्या हाकेला प्रतिसाद देत राज्यभरातून लाखो मराठा बांधव मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदान काही तासांतच गर्दीने फुलून गेले. अनेकांनी रिकामी जागा, रेल्वे स्थानक परिसर तसेच बसथांब्यांवर आसरा घेतला. पावसामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असली तरी, घोषणाबाजी आणि मराठा समाजाच्या एकतेचे दर्शन मुंबईकरांना पाहायला मिळाले.
वाहतूक कोंडी आणि पोलिसांची कसोटी
मोठ्या संख्येने आंदोलक मुंबईत दाखल झाल्याने मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. मंत्रालय, सीएसएमटी परिसरात शेकडो आंदोलकांनी मोर्चा वळवून घोषणा दिल्या. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.
जरांगे यांच्या प्रमुख मागण्या
मराठा आणि कुणबी हे एक असल्याचे मान्य करून अंमलबजावणी करावी.
हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅझेटियर लागू करावेत.
ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांच्या नातेवाईकांनाही कुणबी म्हणून मान्यता द्यावी.
आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
कायद्यानुसार मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्यावे.
सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सदावर्ते यांनी यापूर्वी मनोज जरांगे यांच्या मागण्यांना विरोध दर्शवला होता. त्यामुळे आंदोलनकर्त्यांकडून त्यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याआधी त्यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा विचार करून पोलिसांनी क्रिस्टल टॉवर निवासस्थानाजवळ बंदोबस्त वाढवला आहे.