

जालना : मुंबईत उपोषणासाठी प्रशासनाकडून परवानगी नाकारल्यानंतरही मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आपल्या मागणीवर ठाम आहेत. उपोषणाच्या १६ व्या दिवशी, रविवारी त्यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आपण एकटेच मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलनासाठी रवाना होणार असल्याचे घोषित केले.
गणेशोत्सवाच्या काळात सुरक्षेचे कारण देत मुंबई पोलिसांनी जरांगे यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली होती. या निर्णयाचा समाचार घेताना जरांगे यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. सरकार मराठा समाजाच्या ताकदीला घाबरले आहे. गणेशोत्सवादरम्यान गदारोळ घडवून आणायचा आणि त्याचे खापर मराठा समाजावर फोडायचे, असा सरकारचा डाव आहे, असा आरोप त्यांनी केला.
मागणीवर ठाम, उपोषण सुरूच
पाणी, सलाईन आणि औषधोपचार नाकारल्यामुळे मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या अध्यादेशावर सरकारकडून थेट अंमलबजावणी व्हावी, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. दरम्यान, शासनाशी चर्चेचे दरवाजे अद्याप उघडे आहेत. खुल्या मैदानात चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत; परंतु आम्हाला पोकळ आश्वासने नको, थेट अंमलबजावणी हवी आहे, असा इशाराही त्यांनी राजकीय नेत्यांना दिला.
देवेंद्र फडणवीस यांचे जरांगेंना पुनर्विचार करण्याचे आवाहन
गणेशपर्व असताना मुंबईत आंदोलन करणे, गणेशभक्तांना असुविधा होणे कोणासाठी योग्य नाही, त्यामुळे या गोष्टीचा पुनर्विचार झाला पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. त्यांच्या जवळपास सर्वच मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत, काही मागण्या अशा आहेत की ज्या न्यायालयात आहेत, आम्ही तेही अवगत केले आहे की, इतर संवैधानिक पद्धती आहेत किंवा कोर्ट आहे, त्याशिवाय या मागण्या मान्य केल्या जाऊ शकत नाहीत, आम्ही चर्चेची दारे कधीही बंद केलेली नाहीत, जे संविधानात, राज्यघटनेत आहे ते आम्ही करावयास तराय आहोत, कोर्टाने आखून दिलेल्या नियमांच्या बाहेर जाऊन आम्हाला काम करता येणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
गणेशोत्सवानंतर इतर ठिकाणचा पर्याय सूचवला
आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसण्याच्या तयारीत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. रविवारी आझाद मैदान पोलिसांनी पहिला अर्ज फेटाळल्यानंतर मनोज जरांगे यांच्यावतीने नव्याने उपोषणाची परवानगी मागण्यात आली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी अत्यंत कठोर भूमिका घेत दुसऱ्यांदाही या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. गणेशोत्सवानंतर जरांगेंच्या उपोषणाला आझाद मैदान सोडून इतर ठिकाणी परवानगी देण्यात येईल, असे पत्रही मुंबई पोलिसांनी दिल्याची माहिती आहे.
परवानगी का नाकारली
गेल्या वर्षी आंदोलनादरम्यान दक्षिण मुंबईत सुमारे ५,०00 वाहने अनधिकृतपणे उभी राहिल्याने संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण झाले होते, १४ सप्टेंबरपासून मुंबईत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव सुरू आहे. या काळात मुंबईत भाविकांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई अतिशय संवेदनशील मानली जाते. आझाद मैदानातील ७,००० चौरस मीटर जागेत नियम २०२५ नुसार कमाल ५,००० आंदोलकच समावू शकतात. मात्र जरांगेंनी लाखोंच्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. लाखो आंदोलक मुंबईत आल्यास दक्षिण मुंबईतील महत्त्वाची रुग्णालये (जी.टी., कामा, सेंट जॉर्ज, बॉम्बे हॉस्पिटल), न्यायालये आणि आर्थिक केंद्रांच्या कामकाजावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.
केवळ १० सहकारी
या पार्श्वभूमीवर, शांतता राखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी मराठा बांधवांना तूर्त मुंबईत न येण्याचे आवाहन केले आहे. माझ्यासोबत केवळ १० सहकाऱ्यांची टीम आणि दोन रुग्णवाहिका असतील. मी एकटाच मुंबईकडे जाईन, आता सरकार मला एकट्याला तरी आंदोलनासाठी परवानगी देते का, हे पाहायचे आहे, असे ते म्हणाले.