भाजप नेत्या व राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघे १० महिने झाले असतानाच गौरी गर्जे यांनी शनिवारी (दि. २२) वरळीतील राहत्या घरी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले. पतीचे अनैतिक संबंधांच्या असल्याने गौरीने हे टोकाचं पाऊल उचललं अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. पण, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप गौरीच्या कुटुंबीयांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच मंत्री पंकजा मुंडे यांनी आपले सर्व नियोजित दौरे तातडीने स्थगित केले.
अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध
वरळी बीडीडी येथे राहणाऱ्या गौरी गर्जे या केईएम रुग्णालयात डॉक्टर म्हणून कार्यरत होत्या. आत्महत्येच्या घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांनी अनंत गर्जे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “अनंत गर्जे यांचे अनैतिक संबंध असल्याचे गौरीला समजले होते. त्यामुळे पती-पत्नीमध्ये भांडणं व्हायची आणि ती अस्वस्थ असायची,” अशी माहिती गौरीच्या कुटुंबीयांनी दिली. तसेच, “सासरी तिचा छळ व्हायचा,” असा आरोपही पालवे कुटुंबीयांनी केला आहे.
माझ्या पुत्रासमान अनंतला...
अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी थाटामाटात पार पडला होता. या सोहळ्याला मंत्री पंकजा मुंडे यांनीही उपस्थिती दर्शवली होती. “माझ्या पुत्रासमान अनंतला डॉ. गौरीसारखी सुंदर आणि सुशील सहचारिणी मिळाल्याचा आनंद आहे,” अशी पोस्ट त्यांनी त्यावेळी केली होती. परंतु अवघ्या १० महिन्यांत नात्यात इतकी दरी कशी निर्माण झाली?, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
गौरीच्या मामाचे आरोप
डॉ. गौरी पालवे यांच्या मामांनी सांगितले की, “काल दुपारी १ वाजल्यापासून त्यांच्यात भांडण सुरू होते. अनंतचे चॅटींग तिने पाहिले होते आणि तेच पुरावे तिने वडिलांकडेही ठेवले होते. अनंत म्हणतो की, "तिने त्याच्यासमोर आत्महत्या केली, पण आम्हाला त्यावर विश्वास नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल करावा,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, ही आत्महत्या की हत्या याची पडताळणी केली जात आहे.