मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनने खळबळ! MMRDA चे स्पष्टीकरण; आदित्य ठाकरे संतप्त, म्हणाले, "घरांमध्ये डोकावून..."

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ बाहेर अज्ञात ड्रोन फिरल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या आरोपानुसार, या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा दावा केला जात आहे.
मातोश्रीबाहेर अज्ञात ड्रोनने खळबळ! MMRDA चे स्पष्टीकरण; आदित्य ठाकरे संतप्त, म्हणाले, "घरांमध्ये डोकावून..."
Published on

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ बाहेर अज्ञात ड्रोन फिरल्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या आरोपानुसार, या ड्रोनच्या माध्यमातून मातोश्रीवर नजर ठेवली जात असल्याचा दावा केला जात आहे. MMRDA ने या घटनेवर स्पष्टीकरण देत सांगितले की, हा ड्रोन पॉडटॅक्सी प्रकल्पासाठी सुरु असलेल्या सर्वेक्षणाचा भाग होता आणि यासाठी मुंबई पोलिसांकडून आवश्यक परवानगी मिळाली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांना हे स्पष्टीकरण पटलेले नसून त्यांनी MMRDA ला प्रश्न विचारले आहेत.

मातोश्रीच्या सुरक्षेत वाढ

सध्या उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. मातोश्री आणि MMRDA कार्यालयादरम्यान असलेल्या रस्त्यावर हा ड्रोन घिरट्या घालताना सुरक्षारक्षकांच्या दृष्टीस पडला. सुरक्षारक्षकांनी ड्रोनचा व्हिडीओ शूट केला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ठाकरे गटाच्या आरोपानुसार, या ड्रोनच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना भेटायला येणाऱ्या व्यक्तींवर टेहाळणी केली जात आहे. घटनेनंतर मातोश्रीच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्यात आली आहे.

आमच्याच घराचा सर्व्हे?

या प्रकरणी आदित्य ठाकरे यांनी X वर पोस्ट करत ५ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटले,
"आज सकाळी आमच्या घरात एक ड्रोन डोकावताना पकडला गेला. मीडियाला कळल्यावर MMRDA सर्वेक्षण चालू असल्याचे सांगत आहे. ठीक आहे. पण, कोणत्या सर्वेक्षणामुळे तुम्हाला घरांमध्ये डोकावून पाहता येईल आणि पकडल्यावर लगेच बाहेर पडता येईल? रहिवाशांना याबाबत माहिती का देण्यात आली नाही? MMRDA फक्त संपूर्ण बीकेसीसाठी आमच्याच घराचा सर्व्हे करत आहे का? MMRDA ने जमिनीवर येऊन त्यांच्या बनावट कामावर लक्ष केंद्रित करावे, जसे की MTHL (अटल सेतू) हे त्यांच्या भ्रष्टाचाराचे उदाहरण आहे. जर पोलिसांनी परवानगी दिली असेल, तर रहिवाशांना याबाबत माहिती का दिली नाही?"

अतिरेकी पार्श्वभूमी कारण?

याबरोबरच शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी या घटनेवर चिंता व्यक्त करत म्हटले,
"शिवसेना पक्षप्रमुख यांच्या निवासस्थान ‘मातोश्री’च्या बाहेर एक ड्रोन घिरट्या करताना दिसला. पण प्रश्न असा आहे की हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? या ड्रोनद्वारे चित्रीकरण का करण्यात आले? यामागे कोणतीही अतिरेकी पार्श्वभूमी कारण तर नाही ना? मातोश्रीसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या संवेदनशील क्षेत्रात न कळवता ड्रोनद्वारे शूटिंग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. सखोल चौकशी करून या ड्रोनमागील उद्देश, जबाबदार व्यक्ती आणि त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट करावी, जेणेकरून नागरिकांच्या मनातील संभ्रम दूर होईल."

हा ड्रोन अज्ञात नाही

बीकेसी पोलिसांनी आणि MMRDA ने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे की, हा ड्रोन अज्ञात नाही, तर ८ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबरदरम्यान सुरु असलेल्या सर्वेक्षणाचा भाग होता आणि सर्वेक्षणासाठी पोलिसांकडून आवश्यक परवानगी घेण्यात आली होती.

logo
marathi.freepressjournal.in