
पंजाब नॅशनल बँक (PNB) घोटाळा प्रकरणातील फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियम न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. त्याने प्रत्यार्पणापासून पळ काढण्यासाठी भारतात जीवाला धोका असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, कोर्टाने त्याचे सर्व दावे निराधार ठरवत भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा केला आहे. या संबंधी सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली असून चोक्सीला मुंबईतील ऑर्थर रोड तुरुंगाच्या बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्याची तयारी सुरू आहे.
६६ वर्षीय मेहुल चोक्सी बेल्जियम पोलिसांच्या ताब्यात आहे. PNB घोटाळ्यानंतर मेहुल चोक्सी आणि त्याचा पुतण्या नीरव मोदी दोघेही देश सोडून पळाले. भारतीय गृह मंत्रालयाच्या (MHA) विनंतीनंतर ११ एप्रिल २०२५ रोजी बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याची पळून जाण्याची शक्यता पाहता बेल्जियम कोर्टाने त्याचे अनेक जामिनही फेटाळले. आता त्याने दावा केला, की भारतात त्याचा छळ केला जाईल, त्याच्या जीवाला धोका असून भारतीय तुरुंगात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. मात्र, कोर्टाने त्याचे हे दावे निराधार म्हणत फेटाळले.
चोक्सीविरोधातील आरोप
भारताने चोक्सीविरुद्ध फसवणूक, कागदपत्रांची हेराफेरी, भ्रष्टाचार आणि बनावटगिरी यांसारखे गंभीर गुन्हे नोंदवले आहेत. या गुन्ह्यांची कालावधी ३१ डिसेंबर २०१६ ते १ जानेवारी २०१९ आहे. भारताने बेल्जियम कोर्टाला प्रत्यार्पणाची विनंती करत म्हटले, मेहुल चोक्सी बेल्जियम नागरिक नाही, परंतु विदेशी नागरिक असल्याने बेल्जियम प्रत्यार्पण कायदा १८७४ अंतर्गत भारताकडे सुपूर्द केला जाऊ शकतो.
बेल्जियम न्यायालयाचा निकाल
भारताच्या या विनंतीवर बेल्जियमच्या न्यायालयाने नमूद केले, की भारतात नोंदवलेले हे गुन्हे बेल्जियमच्या कायद्यानुसार दंडनीय आहेत. तथापि, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न हा बेल्जियममध्ये गुन्हा नाही, म्हणून तो लागू होत नाही. मात्र, बाकी सर्व गुन्हे हे गंभीर आहेत.
बेल्जियमच्या अँटवर्प न्यायालयाने प्रत्यार्पणासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांची पूर्तता झाल्याचे मान्यता दिली आहे. न्यायालयानुसार, चोक्सीच्या विरोधातील भारतीय दंड संहिता कलम १२० ब, २०१, ४०९, ४२०, ४७७ अ अंतर्गत गुन्हे गंभीर आहेत. बेल्जियमच्या क्रिमिनल कोडच्या कलम ६६, १९६, १९७, २१३, २४०, २४१, २४५, २४६, ४९६ अंतर्गत गुन्हे दंडनीय आहेत.
ऑर्थर रोड तुरुंगातील व्यवस्था
चोक्सीला ठेवण्यासाठी ऑर्थर रोड तुरुंगातील बराक क्रमांक १२ निश्चित करण्यात आला आहे. भारत सरकारच्या नियमांनुसार, मेहुल चोक्सीला फक्त वैद्यकीय गरज असल्यास किंवा कोर्टाची सुनावणी असल्यासच बाहेर नेले जाईल.
गेल्या आठवड्यात अँटवर्पमधील अपील न्यायालयाने चोक्सीचे भारतात प्रत्यार्पण करण्यास मान्यता दिली होती. त्यामुळे, लवकरच मेहुल चोक्सी मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगात ताब्यात ठेवला जाणार आहे आणि त्याच्या विरोधातील प्रकरणात पुढील न्यायिक प्रक्रिया सुरू होईल.