मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात पार पडणार आहे. या कामासाठी मुंबई उपनगरात नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर वेळेत पोहचण्यासाठी आणि मतपेट्या जमा केल्यानंतर घरी जाण्यासाठी मेट्रो आणि बेस्ट बस सेवा उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मेट्रो आणि बेस्ट प्रशासनाला दिले आहेत.
दहिसर विधानसभा मतदारसंघाच्या रिटर्निंग ऑफिसर शीतल देशमुख यांनी मतदानाच्या दिवशी निवडणूक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर येण्यासाठी आणि परत घरी जाण्यासाठी मेट्रो, बेस्ट बस सेवेचा विस्तार करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. या विनंतीनुसार महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी मेट्रो आणि बेस्ट प्रशासनाला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक वाहतूक सेवा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. मतदानाच्या दिवशी परिवहन सेवा पहाटे ४ वाजता सुरू करावी आणि दुसऱ्या दिवशी रात्री १ वाजेपर्यंत सुरू ठेवावी, असे निर्देश दिले आहेत.
या निर्णयामुळे मतदान केंद्रावर निवडणूक कर्मचाऱ्यांना पोहचण्यास आणि परत रात्री घरी जाण्यास मदत होणार आहे. यासोबतच मतदानासाठी लांबून येणाऱ्या मतदारांनाही फायदा होणार असून मतदानाचा टक्काही वाढण्याची आशा आहे.
पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता
निवडणूक कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी मेट्रो १ प्रशासनाने मतदानाच्या दिवशी वर्सोवा आणि घाटकोपर येथून पहिली मेट्रो पहाटे ४ वाजता सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दोन्ही स्थानकांवरून शेवटची सेवा रात्री १ वाजेपर्यंत सुरू राहील, असे मेट्रो १ प्रशासनाने जाहीर केले आहे. यामुळे उपनगरातील निवडणूक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.