‘म्हाडा लोकशाही दिन’ १३ फेब्रुवारीला, सर्वसामान्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण

‘म्हाडा लोकशाही दिन’ १३ फेब्रुवारीला, सर्वसामान्यांच्या तक्रारींचे वेळीच निवारण

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित ‘म्हाडा लोकशाही दिन’ या महिन्यात मंगळवार, १३ फेब्रुवारीला

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणामध्ये (म्हाडा) प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी आयोजित ‘म्हाडा लोकशाही दिन’ या महिन्यात मंगळवार, १३ फेब्रुवारीला म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवनातील चौथ्या मजल्यावरील सभागृहात दुपारी १२ वाजता आयोजित करण्यात आला आहे. संबंधित अर्जदारांनी याची नोंद घेण्याचे आवाहन म्हाडा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नवीन वर्षापासून प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली ‘म्हाडा लोकशाही दिन’ आयोजित करण्यात येत आहे. ८ जानेवारी रोजी झालेल्या पहिल्या लोकशाही दिनामध्ये १५ अर्ज प्राप्त झाले. या सर्व अर्जदारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित अर्जदारांच्या अर्जाबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित लोकशाही दिन अंतर्गत सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, अडचणी यांचे न्याय व तत्परतेने शासकीय यंत्रणेकडून निराकरण करण्यात येत आहे. म्हाडा लोकशाही दिनासाठी अर्ज विहित नमुन्यात असणे आवश्यक असून त्याचे नमुने म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्यानुसार अर्जदाराची तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, तसेच अर्जदाराने अर्ज विहित नमुन्यात १४ दिवस अगोदर दोन प्रतींत पाठवणे आवश्यक आहे. नागरिकांना तत्काळ निर्णय देणे सुलभ व्हावे याकरिता विषयाशी निगडित संबंधित विभाग/मंडळ प्रमुखदेखील हजर राहणार आहेत. तसेच म्हाडा लोकशाही दिनातील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या अर्जाची पोच पावती दिली जाणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in