

स्वीटी भागवत / मुंबई
मुंबई मंडळाच्या सुरू असलेल्या सोडतीतील अनेक महागड्या घरांकडे ग्राहकांनी पाठ फिरवल्याने म्हाडा घरांच्या किमती कमी करण्याच्या विचारात आहे. उच्च उत्पन्न गटातील (एचआयजी) अनेक सदनिका आणि 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' यातील घरे पडून आहेत. त्या पार्श्वभूमीवर, किमती कमी करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
म्हाडा मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' योजनेंतर्गत असलेल्या ११७ पैकी ५४ सदनिका अजूनही विक्रीविना पडून आहेत. म्हाडाच्या नियमांनुसार आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली अशा विक्रीविना राहिलेल्या सदनिकांच्या किमती कमी करण्याची प्रक्रिया राबवली जाऊ शकते.
अत्यल्प, अल्प गटाला जास्त प्रतिसाद
म्हाडा मुंबई मंडळाने २९ मार्चला २,६४० घरांसाठी सोडत जाहीर केली आहे. यामध्ये विक्रोळी, गोरेगाव, बोरिवली, गोराई, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, दादर आणि माझगाव या भागांतील घरांचा समावेश आहे. या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५, अल्प गटासाठी ८५८, मध्यम गटासाठी १,४०८ आणि उच्च उत्पन्न गटासाठी २२९ सदनिका उपलब्ध आहेत. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांसाठी मोठी मागणी असली, तरी उच्च उत्पन्न गटातील घरांना मिळणारा प्रतिसाद मात्र थंड आहे.
त्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल
सध्याच्या सोडतीत ताडदेव येथील घरांची किंमत ६.७७ कोटी, प्रभादेवी ६.१३ कोटी, जुहू २.१७ कोटी ते ४.३८ कोटी आणि बोरिवली येथील घरांची किंमत २.०९ कोटी रुपये आहे. सध्याच्या सोडत चक्राचा पूर्ण प्रतिसाद पाहिल्यानंतर किमती सुधारण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. मात्र, विक्री वाढवण्यासाठी ठराविक घरांच्या किमतीत कपात होण्याची दाट शक्यता आहे.