म्हाडा करणार अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास; विकासकांनी पाठ फिरवल्याने म्हाडाचा निर्णय

अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. यामुळे वसाहतीमधील इमारती धोकादायक अस्वस्थेत आल्या आहेत.
म्हाडा करणार अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास; विकासकांनी पाठ फिरवल्याने म्हाडाचा निर्णय
Published on

तेजस वाघमारे : मुंबई

अंधेरी पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. यामुळे वसाहतीमधील इमारती धोकादायक अस्वस्थेत आल्या आहेत. या वसाहतीचा पुनर्विकास खाजगी विकासकामार्फत करण्यासाठी म्हाडामार्फत निविदा मागविण्यात आल्या. मात्र निविदा प्रक्रियेकडे विकासकांनी पाठ फिरविल्याने या वसाहतीचा पुनर्विकास स्वतःच करण्याचे म्हाडाने ठरवले आहे. त्यानुसार वास्तुविशारदाची नेमणूक करण्याची तयारी सुरू केली आहे.

अंधेरी पूर्वेला पीएमजीपी वसाहत असून येथे १७ इमारती आहेत. या इमारतीमध्ये ९८६ रहिवासी वास्तव्य करत आहेत. या इमारती जीर्ण झाल्या आहेत. गेली १६ वर्षांपासून हा प्रकल्प रखडल्याने गृहनिर्माण विभागातील अधिकाऱ्यांनी विकासक आर्थिक सक्षम नसल्याचा ठपका ठेवला होता. त्याप्रमाणे विकासकाचे पुनर्विकासाचे सर्व अधिकार रद्द करून हा पुनर्विकास म्हाडाने किंवा सक्षम विकासकाची नेमणूक करून करण्याचे निर्देश गृहनिर्माण विभागाने म्हाडाच्या दिले होते.

या वसाहतीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाकडे निधी नसल्याने पुनर्विकास रखडला होता. अखेर म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या अधिकाऱ्यांनी यावर तोडगा काढला. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सीमार्फत पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत यासाठी दोन वेळा निविदा मागवल्या. मात्र विकासकांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेर म्हाडाने स्वतःच हा प्रकल्प पूर्ण करण्याचे ठरवले आहे.

वसाहतीच्या पुनर्विकासासाठी वास्तुविशारदाची नेमणूक करण्याचा निर्णय म्हाडाच्या मुंबई मंडळाने घेतला आहे. अंधेरी पूर्वेला इमारतीच्या उंचीवर निर्बंध असल्याने या ठिकाणी १६ मजली इमारती उभारून यामधून म्हाडाला विक्री करण्यासाठी अधिकाधिक घरे मिळविण्याचा मंडळाचा प्रयत्न असल्याचे म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in