

मुंबई : नाशिक महानगरपालिकेमार्फत सुमारे बारा विकासकांना एफएसआय/ टीडीआर देण्यात येत नसल्याने विकासकांनी म्हाडास राखीव क्षेत्र हस्तांतरीत करण्यास असमर्थता दर्शविली आहे. नाशिक महापालिकेच्या लालफितीच्या कारभारामुळे अत्यल्प व अल्प गटासाठी अंदाजे ५ हजार घरांची गृहनिर्माण योजना राबविण्यात अडथळा निर्माण झाला आहे. याबाबत नाशिक महानगरपालिकेला सूचना देण्यात यावी, अशी विनंती म्हाडाने राज्याच्या नगरविकास विभागाकडे केली आहे.
सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत राखीव क्षेत्र म्हाडाला विनामुल्य हस्तांतरीत करणाऱ्या विकासकास संबंधित महानगरपालिकेने एफएसआय /टीडीआर देणे अभिप्रेत आहे. मात्र नाशिक महानगरपालिकेने विकासकांना म्हाडास सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेकरिता उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या भुखंडाच्या मोबदल्यात एफएसआय/ टीडीआर देण्यात आलेला नाही. म्हाडाने नगरविकास विभागाला पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची विनंती केली.