मुंबईसह आजूबाजूच्या शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी उष्णता सर्वानाच असह्य होत आहे. पक्षी देखील या दाहकतेचे बळी ठरत आहेत. या सर्व कारणांमुळेच एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच काही स्थानिक आणि परदेशी पक्ष्यांकडून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अन्न, पाणी व थंड भूभागाच्या शोधात ते कित्येक किलोमीटर दूर जात असल्याचे पक्षी अभ्यासक प्रथमेश देसाई यांनी सांगितले.
उन्हाळ्यात वाढत्या तापमानाचा परिणाम पक्षी, प्राण्यांवर सर्रास होतो. उष्माघाताने कित्येक पक्षी दगावल्याचे, आजारी पडल्याचे अनेकदा पाहायला मिळते. ज्या ठिकाणी तापमान अधिक आणि पाण्याची मुबलकता कमी आहे तेथे पक्ष्यांना उष्माघात होतो. अशातच मुंबईसह आजूबाजूच्या शहरात तापमान वाढीने टोक गाठले आहे. परिणामी वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी स्थानिक पक्षी देखील इतर जिल्हे, राज्यात, स्थलांतर करत असल्याचे पक्षी मित्रांकडून सांगण्यात आले आहे. यामध्ये अगदी कावळा, चिमणी, बगळे या पक्ष्यांसोबत मुनीया, सुगरण, करकोचा, फ्लेमिंगो, सीगल या पक्ष्यांचा देखील समावेश आहे. हे पक्षी तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करताना आढळतात. पक्ष्यांच्या स्थलांतरामुळे त्यांच्या प्रजातींचे प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीपासून संरक्षण होतेच; शिवाय त्यांचे स्थलांतर इतर पशु-पक्ष्यांसाठीही सहाय्यक ठरते. शिवाय स्वत:त शारीरिक बदल घडवतात. भारतात उन्हाळ्यात कोम्ब डक, ब्लू टेल्ड बी इटर, ककुज, काळ्या तुऱ्याचे हेरॉन असे परदेशी पक्षी येतात, तर सीगल, फ्लेमिंगो, मुनिया हे पक्षी भारतातून इतरत्र स्थलांतर करतात.
'अशी' असते पक्ष्यांची उन्हाळ्यातील दिनचर्या
उन्हाळ्यात पक्षी भल्या पहाटे लवकर बाहेर पडतात. ऊन वाढूलागले की दुपारी झाडावर विसावा घेतात. सायंकाळी पुन्हा भक्ष्याच्या शोधात भटकतात. या काळात पाणथळ जागी, थंड ठिकाणी घरटी बांधणे, अंडी घालणे या प्रक्रिया पक्ष्यांकडून केल्या जातात. जेथे पाणी, खाद्य, वातावरण थंड असेल त्या ठिकाणी पक्षी उन्हाळ्यात थांबणे पसंत करतात.उन्हाळ्यात पक्ष्यांचे मुख्य खाद्य कीटक. कीटकांपासून त्यांना मुबलक प्रथिने मिळतात. ऋतुमानानुसार पक्षी त्यांच्या दिनचर्येत बदल करतात.
स्थलांतर परदेशी पक्षीच करतात ही बाब असत्य आहे. आपल्या येथील स्थानिक पक्षी देखील उन्हाळ्याच्या दिवसात स्थलांतर करतात. त्यांचे अंतर अधिकचे नसते. मात्र उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेक पक्षी जागेत बदल करतात.
- प्रथमेश देसाई, पक्षी अभ्यासक