मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी

१३ मार्चच्या सकाळी ते रुग्णाला भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेले. तेव्हा महिलेच्या हाताला उंदीर कुरतडत असल्याचे त्यांना दिसले. ते आयसीयूमध्ये जाताच तो उंदीर...
मीरा-भाईंदरच्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार; व्हेंटिलेटरवरील वृद्ध महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले, कुटुंबीयांची चौकशीची मागणी
'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

मिरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक घटना समोर आली आहे. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (ICU) दाखल असलेल्या ८९ वर्षांच्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षेच्या व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सुहासिनी माठेकर (८९) यांना १२ मार्च रोजी प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना रुग्णालयाच्या चौथ्या मजल्यावरील आयसीयू (ICU) मध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.

कुटुंबीयांना दिसला धक्कादायक प्रकार

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, १३ मार्चच्या सकाळी ते रुग्णाला भेटण्यासाठी आयसीयूमध्ये गेले. तेव्हा महिलेच्या हाताला उंदीर कुरतडत असल्याचे त्यांना दिसले. ते आयसीयूमध्ये जाताच तो उंदीर तेथून पळून गेला. पण तोपर्यंत उंदराने कुरतडल्याने महिलेच्या हाताला दुखापत झाली होती.

रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप

या घटनेनंतर कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. रात्रीच्या ड्युटीवरील डॉक्टर आणि परिचारिकांना ICU सारख्या अत्यंत संवेदनशील विभागात उंदराची उपस्थिती किंवा रुग्णाची अवस्था कशी लक्षात आली नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

कुटुंबातील एका सदस्याने सांगितले की, "ICU सारख्या स्वच्छ आणि सतत देखरेखीखाली असलेल्या विभागात अशी घटना घडणे अत्यंत धक्कादायक आहे."

चौकशीची मागणी

या प्रकरणानंतर कुटुंबीयांनी घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. रुग्णालयातील स्वच्छता आणि पेस्ट कंट्रोल व्यवस्थेचा तातडीने ऑडिट करावा तसेच जबाबदार व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी कुटुंबीयांनी केली आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्येही संताप व्यक्त होत असून रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in