मिरा-भाईंदर परिसरातील नवघर येथील इंद्रलोक झोपडपट्टीत शुक्रवारी (दि. १०) रात्री लागलेल्या भीषण आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. झोपड्यांमध्ये लागलेल्या आगीने क्षणार्धात विक्राळ रूप धारण केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
आग कशी लागली?
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मिरा-भाईंदर महापालिकेचे मुख्य अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवघर येथील इंद्रलोक झोपडपट्टी भागात आग लागल्यानंतर काही क्षणातच ती झपाट्याने पसरली.
गवत, कापड आणि तात्पुरत्या साहित्यापासून बनलेल्या झोपड्यांमुळे आग वेगाने पसरत गेली. आगीच्या ज्वाळा दूरवरूनही दिसत होत्या.
३० ते ३५ झोपड्या जळून खाक
या आगीत सुमारे ३० ते ३५ झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. आगीदरम्यान अनेक एलपीजी सिलिंडरचा स्फोट झाला, ज्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली. अग्निशमन दलाने घटनास्थळावरून २४ सिलिंडर सुरक्षितपणे बाहेर काढले, त्यापैकी काही भरलेले तर काही रिकामे होते.
तासभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात
अग्निशमन दलाने जवळपास एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं.
३ जणांचा होरपळून मृत्यू
या भीषण आगीत तीन जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, त्यांचे मृतदेह ओळखू न येण्याइतके जळाले होते. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून, याबाबत पुढील तपास सुरू आहे.