मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या असून, त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.
मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड
Published on

भाईदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका १५ जानेवारी रोजी पार पडल्या असून, त्याचा निकाल १६ जानेवारी रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवत एकहाती सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर महापालिकेवर भाजपचाच महापौर विराजमान होणार हे निश्चित झाले आहे.

दरम्यान, २२ जानेवारी रोजी महापौरपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यावेळी सर्वसाधारण महिला या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव ठेवण्यात आले आहे. त्यानंतर २३ जानेवारी रोजी महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अधिकृतपणे जाहीर करण्यात आला. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून कोणत्या महिला नगरसेविकेची महापौरपदी निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित सदस्यांमधून महापौर व उपमहापौर निवडण्यासाठी महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी नगरविकास विभागाला पत्र पाठविले होते. त्यानुसार नगरविकास विभागाने महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी ३ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेसाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या नियंत्रणाखाली ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

दरम्यान, मीरा-भाईंदर शहरात गेल्या काही दिवसांपासून मराठी महापौर बसवावा, अशी मागणी होत आहे. मात्र, याबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. त्यामुळे महापौरपदी कोणाची निवड होणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून, येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in