

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिका शहरातील कबूतरखाने हटवण्याची कारवाई करत आहे, तसेच सार्वजनिक ठिकाणी कबूतरांना दाणे टाकण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर मीरारोडमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कबूतरांना दाणे टाकू नका, असे सांगितल्यावर एका वृद्ध व्यक्ती आणि त्यांच्या मुलावर हल्ला करण्यात आला आहे.
ही घटना मीरारोड येथील ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीमध्ये रविवारी घडली. महेंद्र पटेल (वय ६९) हे इमारतीच्या सार्वजनिक भागात असताना, त्यांना कबूतरांना दाणे टाकताना आशा व्यास (वय ५६) दिसल्या. पटेल यांनी त्यांना दाणे टाकू नका असे सांगितले असता, त्यांनी शिवीगाळ सुरू केली.
गोंधळ ऐकून महेंद्र पटेल यांचा मुलगा प्रेमल पटेल (वय ४६) इमारतीखाली आला. त्याने आपल्या वडिलांना शिवीगाळ का करता? अशी विचारणा केली. यावरून व्यास यांनी प्रेमल यांनाही शिवीगाळ केली. त्याचदरम्यान, व्यास यांच्या ओळखीच्या सोमेश अग्निहोत्रीने त्यांच्या भांडणात मध्यस्थी केली. त्याने आणखी दोघांना बोलवून प्रेमलवर लोखंडी रॉडने हल्ला केला आणि त्याचा गळा दाबला. यासह त्याच्या वडिलांनाही मारहाण केली.
या प्रकरणी काशीमीरा पोलीस ठाण्यात आशा व्यास, सोमेश अग्निहोत्री व अन्य दोन अनोळखी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
ही घटना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करताना सामान्य नागरिकांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे.