मिठी नदी घोटाळा : BMC ची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदाराला अटक

मिठी नदी सफाईच्या कामात तब्बल ६५ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेविरोधी शाखेने कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी अशा १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये २ मध्यस्थींना अटक केले असून आता या प्रकरणी एका कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे.
मिठी नदी घोटाळा : BMC ची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी कंत्राटदाराला अटक
Published on

मिठी नदी सफाईच्या कामात तब्बल ६५ कोटीहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हेविरोधी शाखेने कंत्राटदार आणि महापालिका अधिकारी अशा १३ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याआधी २ मध्यस्थींना अटक केले असून आता या प्रकरणी एका कंत्राटदारालाही अटक करण्यात आली आहे.

मंदीप एंटरप्रायजेसचा कंत्राटदार शेर सिंह राठोड (वय ५०) याला अटक करण्यात आली असून या प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वी मध्यस्थी केतन कदम आणि जय जोशी यांना पोलिसांनी अटक केली आहे.

मृत व्यक्तीच्या बनावट सह्या

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, राठोडने सादर केलेल्या एका करारपत्रावर एका मृत व्यक्तीच्या सह्या असल्याचे तपासात उघड झाले आहे. अनियमिततेतील त्याची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर, आर्थिक गुन्हेविरोधी शाखेने त्याला ताब्यात घेतले.

२०२१-२२ मध्ये मिठी नदी गाळ काढण्यासाठी राठोडने बीएमसीकडून कंत्राट घेतले होते. त्याने गाळाची विल्हेवाट लावण्यासाठी जमीन मालकांसोबत सामंजस्य करार केल्याचेही दाखवले, मात्र प्रत्यक्ष तपासात ती कागदपत्रे बनावट असल्याचे आढळले. त्याने मृत व्यक्तीला जमीनदार दाखवून त्याच्या नावाने बनावट सह्याही केल्या आहेत.

BMC कडून २९.६२ कोटी रुपये उकळले

याशिवाय, मॅटप्रॉप कंपनीच्या मशीन भाड्याने घेण्यासाठी मध्यस्थी केतन कदमसोबत करार केल्याचे दाखवून बीएमसीला कागदपत्रे सादर केली. राठोडने बीएमसीला डंपरची यादीही दिली, ज्यामध्ये मिठीतून गाळ वाहून नेल्याचा दावा करण्यात आला होता. प्रत्यक्षात मात्र विविध ठिकाणांहून गोळा केलेला कचरा नदीतील गाळ म्हणून दाखवण्यात आला. या बनावट योजनेतून राठोडने बोगस बिले सादर करून बीएमसीकडून तब्बल २९.६२ कोटी रुपये उकळले.

एकूण १३ जणांविरुद्ध गुन्हा

गेल्या २० वर्षांपासून मिठी नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प सुरू असून यासाठी १,१०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांकडे हे काम सोपवण्यात आले होते. मात्र, मे महिन्यात ‘एसआयटी’ने या प्रकरणात कैलाश कन्स्ट्रक्शनचे मनीष काशिवाल, ॲक्यूट एंटरप्रायजेसचे ऋषभ जैन आणि मंदीप एंटरप्रायजेसचा शेर सिंह राठोड या कंत्राटदारांना समन्स बजावले होते. या प्रकरणात अभिनेता दीनो मोरिया आणि त्याच्या भावाचीही चौकशी सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in