गणेशोत्सवासाठी MMRDA चा दिलासा! खास मुंबईकरांसाठी मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळेत वाढ

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सवासाठी MMRDA चा दिलासा! खास मुंबईकरांसाठी मेट्रोच्या फेऱ्या आणि वेळेत वाढ
Published on

गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (MMRDA) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहिसर-अंधेरी पश्चिम मार्गावरील मेट्रो २ अ आणि दहिसर-गुंदवली मार्गावरील मेट्रो ७ या दोन्ही मार्गिकांच्या सेवाकालात ११ दिवसांसाठी वाढ करण्यात आली आहे.

२७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर दरम्यान सुविधा

  • गणेशोत्सव काळात २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो सेवा रात्री ११ ऐवजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. गणपती दर्शन, देखावे पाहणे तसेच विसर्जनासाठी उशिरापर्यंत बाहेर पडणाऱ्या नागरिकांना यामुळे मोठी सोय होणार आहे.

  • सध्या मेट्रो २ अ आणि ७ वर सोमवार ते शुक्रवारदरम्यान दररोज ३०५ फेऱ्या होतात. मात्र, गणेशोत्सवातील ११ दिवसांमध्ये रोज १२ फेऱ्या वाढवून या संख्येचा आकडा ३१७ फेऱ्यांवर जाणार आहे.

  • गर्दीच्या वेळेत दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी एक गाडी धावेल.

  • तर कमी गर्दीच्या वेळेत दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी गाडी सुटेल.

सुट्टीच्या दिवशीही वाढ

सेवा कालावधी वाढल्याने शनिवार-रविवारी देखील अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. रविवारी आतापर्यंत २१७ फेऱ्या होत असल्या, तरी आता त्या वाढून २२९ फेऱ्यांपर्यंत पोहोचणार आहेत.

प्रवाशांना मोठा दिलासा

एमएमआरडीएच्या या निर्णयामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवात मेट्रो प्रवाशांना अधिक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे. रात्री उशिरापर्यंत मेट्रो उपलब्ध राहिल्याने गणपती उत्सवाचा आनंद घेणाऱ्या मुंबईकरांची प्रवासातील कोंडी आणि वाहतुकीची अडचण कमी होण्यास मदत होईल.

logo
marathi.freepressjournal.in