म्हाडा लॉटरीतील ४०० हून अधिक घरे विजेत्यांनी केली परत; पुढील सोडतीमध्ये होणार समावेश

गेल्या सोडतीमध्ये अपयशी ठरलेल्या अर्जदारांना घर खरेदीची आणखी एक संधी मिळणार
म्हाडा लॉटरीतील ४०० हून अधिक घरे विजेत्यांनी केली परत; पुढील सोडतीमध्ये होणार समावेश

मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत गत वर्षी ऑगस्ट महिन्यात काढण्यात आलेल्या सोडतीमध्ये एकाहून अधिक घरे मिळालेल्या अनेक विजेत्यांनी घरे परत केली आहेत. अशा घरांची संख्या ४०० हून अधिक असून ही घरे ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. त्यामुळे गेल्या सोडतीमध्ये अपयशी ठरलेल्या अर्जदारांना घर खरेदीची आणखी एक संधी मिळणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने गत वर्षी काढलेल्या सोडतीमध्ये ४०८२ घरांचा समावेश केला होता. सोडतीपूर्वीच म्हाडाने अर्जदारांची पात्रता करून घेतल्याने घराची रक्कम भरणाऱ्या विजेत्यांना घराचा ताबा देण्यात आला. अद्यापही विजेत्यांना घराचा ताबा देण्याची प्रक्रिया मुंबई मंडळाकडून सुरु आहे. आतापर्यंत मंडळाने सुमारे ३ हजार १०० विजेत्यांना घरांचा ताबा दिला आहे. सोडतीमध्ये एकाहून अधिक घरे मिळालेल्या विजेत्यांना नियमानुसार एकच घर घेता येते. त्याप्रमाणे विजेत्यांनी इतर घरे म्हाडाला परत केली आहेत. त्यानुसार सुमारे ४०० हून अधिक घरे मंडळाकडे उपलब्ध असल्याचे, म्हाडातील अधिकाऱ्याने सांगितले.

अर्ज प्राप्त न झालेले आणि शिल्लक अशी सुमारे ४०० घरे ऑगस्ट महिन्यात काढण्यात येणाऱ्या सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. या सोडतीमध्ये १ हजाराहून अधिक घरांचा समावेश असणार आहे.

आगामी सोडतीमध्ये येथील घरांचा समावेश

गोरेगाव, पवई -तुंगा, कन्नमवार नगर आणि दक्षिण मुंबईतील घरांचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in