मुंबईकरांच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (दि. २२) सकाळी अपघाताची घटना घडली. मुलुंड टोलनाक्याजवळील पुलावर एकाच वेळी ८ ते ९ वाहने एकमेकांवर जोरदार आदळली. या अपघातामुळे वाहनांच्या पुढील आणि मागील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, परिसरात काही काळ भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरून ठाण्याकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळच्या सुमारास हा अपघात घडला. पुढे असलेल्या एका कारने अचानक ब्रेक मारल्याने मागून येणाऱ्या भरधाव गाड्यांची एकमेकांना जबर धडक झाली.
अपघातग्रस्त वाहनचालकाने दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या कारचालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी अचानक ब्रेक दाबला. पुढच्याने ब्रेक दाबल्याने या वाहनचालकानेही ब्रेक दाबला. यामुळे त्याच्या पाठीमागे वाहनांची धडक झाली. ज्या कारचालकाने दुचाकीस्वाराला वाचवण्यासाठी ब्रेक दाबला त्याचे काहीही नुकसान झाले नाही, मात्र पाठीमागे आदळलेल्या वाहनांच्या पुढील आणि मागच्या भागांचा अक्षरश: चुराडा झाला.
जीवितहानी टळली
अपघात इतका गंभीर असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काही वाहनचालक आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर टोलनाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तात्काळ वाहतूक पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि अपघातग्रस्त वाहनं बाजूला करून मार्ग मोकळा करण्यात आला. काही तासांत वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
या घटनेनंतर काही वाहनचालकांनी नवघर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे. प्राथमिक तपासात पुढे असलेल्या वाहनाने अचानक ब्रेक लावल्यामुळे अपघात झाल्याचे समोर आले आहे. मात्र, नेमकी चूक कुणाची याचा तपास पोलिस करत आहेत.