Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ

Mumbai Drone Show : रामनवमीनिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो आयोजित करण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्राची संस्कृती आणि इतिहास आकाशात झळकताना पाहायला मिळणार आहे.
Ram Navami 2026 : श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मुंबईत २००० ड्रोनचा भव्य शो; काय असणार खास? जाणून घ्या वेळ आणि स्थळ
Published on

रामनवमीनिमित्त मुंबईत प्रथमच २००० ड्रोनचा भव्य शो आयोजित करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २६ आणि २७ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून आझाद मैदान येथे हा कार्यक्रम होणार आहे.

परंपरा आणि तंत्रज्ञानाचा संगम

या भव्य ड्रोन शोमध्ये महाराष्ट्राची समृद्ध संस्कृती, इतिहास आणि परंपरा आकाशात जिवंत होतील. विविध प्रतिकात्मक आकृत्या, कथा सांगणारे व्हिज्युअल्स आणि आकर्षक प्रकाशरचना यामुळे हा कार्यक्रम खास ठरणार आहे.

गुढीपाडव्याच्या दिवशी मरीन ड्राइव्ह परिसरात झालेला ड्रोन शो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्या शोमध्ये गुढीची आकृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रभावी दृश्य पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

आझाद मैदान येथे कसे पोहोचाल?

CSMT (छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) येथून :
आझाद मैदान हे स्टेशनपासून केवळ ७ ते १० मिनिटांच्या अंतरावर आहे. डीएन रोडकडे बाहेर चालत जाऊन मैदानाकडे पोहचता येईल.

चर्चगेट स्थानकातून :
५ मिनिटांत टॅक्सी/ऑटोने किंवा १२ ते १५ मिनिटे चालत वीर नरिमन रोडमार्गे आझाद मैदान गाठता येईल.

गर्दी टाळण्यासाठी सूचना

कार्यक्रमासाठी मोठी गर्दी अपेक्षित असल्याने नागरिकांनी लवकर पोहोचण्याचा आणि शक्यतो सार्वजनिक वाहतूक वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुंबईकरांसाठी हा ड्रोन शो तंत्रज्ञान आणि परंपरेचा अनोखा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in