
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारितील उपकरप्राप्त इमारतींच्या पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ अतिधोकादायक इमारती आढळल्या आहेत. या इमारतींमधील रहिवाशांना भाड्याने घर घेण्यासाठी दरमहा २० हजार रुपये भाडे अदा करण्याचा निर्णय 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी जाहीर केला आहे. त्याचप्रमाणे बाह्य यंत्रणेमार्फत तीन वर्षांकरिता १८० ते २५० चौरस फूट क्षेत्रफळाचे ४०० गाळे अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू रहिवाश्यांकरिता भाडेतत्त्वावर घेण्याबाबत जाहिरात देण्याचे निर्देशही मंडळास दिले आहेत.
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे पावसाळापूर्व सर्वेक्षणात ९६ इमारती अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. या अतिधोकादायक इमारतींमध्ये सुमारे २४०० रहिवासी वास्तव्यास असून त्यांना तातडीने संक्रमण शिबिरात स्थलांतरित करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मंडळाकडे फक्त ७८६ संक्रमण गाळे उपलब्ध असल्याने अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात संक्रमण शिबिरांतून पर्यायी निवासाची व्यवस्था देणे मंडळास शक्य नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांच्या जीवितास धोका पोहचू नये व त्यांची मुंबईत इतरत्र निवासाची पर्यायी व्यवस्था देणे आवश्यक असल्याने 'म्हाडा'चे उपाध्यक्ष जयस्वाल यांनी हा निर्णय घेतला आहे.
निर्णय काय?
दोन्ही प्रकारे होणारा खर्च सदर इमारतीच्या जागेवर पुनर्विकासासाठी खासगी विकासकांना, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना विकासासाठी दिल्यास सदर विकासकांना ज्या दिवसापासून मंडळामार्फत प्रतिमाह २० हजार भाडे अदा करण्यात आले आहे अथवा बाह्य यंत्रणेमार्फत तीन वर्षांकरिता १८० चौरस फूट ते २५० चौरस फूट क्षेत्रफळाचे ४०० गाळे भाड्याने घेतलेले आहेत, त्याचा देखभालीसह संपूर्ण खर्च विकासकाने व सहकारी गृहनिर्माण संस्था यांनी भरणे बंधनकारक राहील, असाही निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे.
स्थिती काय?
मुंबई शहर जिल्ह्यात आता प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या उपकरप्राप्त इमारतींची संख्या एकूण १३ हजार ९१ आहे. मंडळाकडे २० हजार ५९१ संक्रमण गाळे आहेत. उपकरप्राप्त इमारती पडणे, धोकादायक म्हणून जाहीर करणे किंवा इमारतीची संरचनात्मक दुरुस्ती अशा विविध कारणांसाठी रिकाम्या करण्यात येणाऱ्या उपकरप्राप्त इमारतीमध्ये वास्तव्य करीत असलेल्या रहिवाश्यांना तात्पुरत्या स्वरूपात निवासाची पर्यायी व्यवस्था करण्याच्या दृष्टीने मंडळामार्फत शहरात व उपनगरात संक्रमण शिबिरामध्ये गाळे उपलब्ध करण्यात येतात.