Mumbai : अभ्युदयनगर रहिवाशांना मिळणार ६४१ चौ.फू.चे घर; म्हाडाकडून विकासकाला ‘स्वीकृती पत्र’ प्रदान

काळाचौकी येथील अभ्युदय नगर या म्हाडाच्या जुन्या वसाहतीचा समूह पुनर्विकास करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Mumbai : अभ्युदयनगर रहिवाशांना मिळणार ६४१ चौ.फू.चे घर; म्हाडाकडून विकासकाला ‘स्वीकृती पत्र’ प्रदान
Mumbai : अभ्युदयनगर रहिवाशांना मिळणार ६४१ चौ.फू.चे घर; म्हाडाकडून विकासकाला ‘स्वीकृती पत्र’ प्रदान
Published on

मुंबई : काळाचौकी येथील अभ्युदय नगर या म्हाडाच्या जुन्या वसाहतीचा समूह पुनर्विकास करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. म्हाडाने या प्रकल्पासाठी एम.जी.एन. ॲग्रो प्रॉपर्टीज प्रा. लि., एन.एन.पी. बिल्डकॉन प्रा. लि. आणि ओनेस्ट शेल्टर्स प्रा. लि. यांच्या कंसोर्टियमने (संघाने) सादर केलेली निविदा स्वीकारली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे सध्या २१० चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना आता ६४१ चौरस फूट चटई क्षेत्राचे आलिशान घर मोफत मिळणार आहे.

म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी यशस्वी निविदाकाराला गुरूवारी 'स्वीकृती पत्र' सुपूर्द केले. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने २७ फेब्रुवारी २०२४ रोजी या वसाहतीचा पुनर्विकास 'बांधकाम आणि विकास' मॉडेलनुसार करण्यास मान्यता दिली होती. त्यानंतर ६ मार्च २०२६ रोजी गृहनिर्माण विभागाने शासन निर्णय निर्गमित केला.

सुरुवातीला या प्रकल्पाच्या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ११ एप्रिल २०२५ रोजी सह्याद्री अतिथीगृह येथे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अभ्युदय नगर फेडरेशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार निविदेच्या अटींमध्ये बदल करण्यात आले, ज्यामध्ये वाढीव क्षेत्रफळ, ५ लाख रुपयांचा कॉर्पस फंड आणि २५ हजार रुपये मासिक भाड्याचा समावेश करण्यात आला. या बदलांनंतर राबवलेल्या निविदा प्रक्रियेत विकासकाची निवड करण्यात आली आहे.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला अभ्युदय नगरचा हा पुनर्विकास प्रकल्प आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे पडले असून, त्यामुळे हजारो कुटुंबांचे हक्काच्या मोठ्या घराचे स्वप्न साकार होणार आहे.

  • प्रकल्प क्षेत्र : ३३ एकर जागा.

  • सध्याची स्थिती : एकूण ४८ इमारती, ३,४१० सदनिका (३,३३५ निवासी आणि ७५ अनिवासी).

  • नवीन घराचे क्षेत्रफळ : ६४१ चौरस फूट.

  • मासिक भाडे : प्रकल्प पूर्ण होईपर्यंत विकासकाकडून दरमहा २५,००० रुपये भाडे.

  • कॉर्पस फंड : प्रत्येक सदनिकाधारकाला ५ लाख रुपये कॉर्पस फंड मिळणार.

  • पार्किंग: प्रत्येक सदनिकाधारकासाठी एक स्वतंत्र पार्किंगची जागा.

logo
marathi.freepressjournal.in