दिल्लीसह मुंबईत वायू प्रदूषणाची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. ऐन दिवाळीच्या उत्सवांच्या काळात शहराची हवा पुन्हा एकदा चिंतेचे कारण बनली आहे. मुंबईतील एकूण वायू गुणवत्ता निर्देशांक (AQI) १६४ नोंदवला गेला, जो ‘अस्वस्थ’ श्रेणीत येतो. गेल्या आठवड्यापासून शहरातील हवेची गुणवत्ता सतत ढासळत असून, मध्यम श्रेणीपासून खराब श्रेणीकडे वाटचाल होत आहे.
भायखळ्यात सर्वाधिक प्रदूषण
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (CPCB) आकडेवारीनुसार, शहरातील काही भागात प्रदूषण गंभीर पातळीवर पोहोचले आहे. भायखळा येथे AQI २१३ नोंदवला गेला, जो ‘गंभीर’ हवेची गुणवत्ता दर्शवितो. त्यानंतर सिद्धार्थ नगर-वरळी २०४, वांद्रे हिल रोड १९१, चेंबूर १८७ आणि देवनार १८७ अशी नोंद आहे. या भागांमध्ये मंगळवारी (दि. २१) सकाळी दाट धुके आणि दृश्यता कमी झाल्याचे पाहायला मिळाले.
तुलनेने स्वच्छ हवा अनुभवली गेली
काही भागात नागरिकांना तुलनेने स्वच्छ हवा अनुभवता आली. शिवडी येथे AQI ७१ नोंदवला गेला, जो ‘मध्यम’ श्रेणीत येतो. विलेपार्ले पश्चिम (११२), बांद्रा पूर्व (११६), कांदिवली पश्चिम (१२०) आणि कुर्ला (१३४) येथे हवा तुलनेने स्वच्छ होती.
आजचे हवामान
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार, आज मुंबईत आभाळ शुभ्र असले तरी उष्णतेचा आणि दमट हवामानाचा सामना करावा लागणार आहे. दिवसभरातील तापमान २६°C ते ३५°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे. समुद्राच्या वाऱ्यांच्या अभावामुळे उष्णतेत अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. IMD अधिकाऱ्यांनी सांगितले की, उत्तर-पूर्व मान्सूनमुळे पश्चिम किनाऱ्यावर पूरक वाऱ्यांचा अभाव असून, त्यामुळे मुंबईसारख्या शहरांमध्ये उष्णतेत वाढ होत आहे.
प्रशासनाचे आवाहन
प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि हवामानशास्त्र विभागाने दिवाळीच्या दिवशी वायू प्रदूषणावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष तयारी केली आहे. प्रशासनाने नागरिकांना फटाके फोडताना सुरक्षित पद्धतींचा अवलंब करण्याचे आणि योग्य स्थान निवडण्याचे आवाहन केले आहे.