

मुंबई : मुंबईत खेळाची मैदाने कमी होत असून मुलांना खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होत नाहीत. त्यात वांद्रे पश्चिम येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलून 'एक्झिबिशन सेंटर' उभारण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव २७ मे रोजी सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. मात्र, या प्रस्तावाला ठाकरे सेनेचा विरोध असून सुधार समितीत त्यावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
मलबार हिल येथील हरित क्षेत्राचे आरक्षण बदलून निवासी आरक्षण टाकण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला असताना आता वांद्रे येथील खेळाच्या मैदानाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव सुधार समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.
पालिकेच्या 'एच/पश्चिम' विभागातील मौजे वांद्रे-अ येथील न.भू.क्र. ७९१क (भाग) या भूखंडावरील, विकास आराखडा २०३४ नुसार क्रीडांगण खेळाचे मैदान यासाठी 'जीआयएस' प्रणालीनुसार ६८९७.४ चौ. मी. जागा आहे.
हरकती-सूचनाही मागवणार
महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम (१) मधील तरतुदीनुसार सदर फेरबदलांबाबत पालिका प्रशासनाकडून हरकती-सूचनाही मागवल्या जाणार असून त्यावर सुनावणीदेखील घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाने प्रस्तावात म्हटले आहे. शिवाय सुधार समितीच्या मंजुरीनंतर राज्य शासनाच्या नगरविकास विभागाची अंतिम मंजुरी घेण्यात येणार असल्याचे प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले आहे.