

मुंबई : भारताने आयसीसी पुरुष टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर रविवारी रात्री देशभर जल्लोषाचे वातावरण होते. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरातही चाहत्यांनी फटाके फोडून विजय साजरा केला. मात्र या आनंदाच्या वातावरणातच वांद्रे पश्चिम येथील माउंट मेरी पायऱ्यांजवळील निर्मला कॉलनीतील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅटच्या गॅलरीत किरकोळ आग लागल्याची घटना घडली.
रॉकेट फटाका गॅलरीत पडताच...
स्थानिकांच्या माहितीनुसार, विजयाचा आनंद साजरा करताना गल्लीतून उडवण्यात आलेला रॉकेट फटाका फ्लॅटच्या गॅलरीत येऊन पडल्याने ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. अचानक गॅलरीतून ज्वाळा दिसू लागल्याने परिसरातील रहिवासी तातडीने घटनास्थळी जमा झाले. त्यांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश करत आग पसरू नये यासाठी तातडीने प्रयत्न केले. स्थानिकांच्या सतर्कतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली नाही.
फ्लॅटमधील रहिवासी बाहेरगावी; जीवितहानी टळली
घटनेच्या वेळी फ्लॅटमधील रहिवासी बाहेरगावी गेले होते आणि घर बंद होते. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक सुमारे ३० मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पुढील तपासणी करून आग पूर्णपणे विझल्याची खात्री केली.
पाहा व्हिडिओ
या घटनेबाबत वांद्रे पश्चिमचे आमदार आणि राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर प्रतिक्रिया दिली. संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले.
भारताचा अंतिम सामन्यात दणदणीत विजय
दरम्यान, अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत टी२० विश्वचषक जिंकला. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांच्या दमदार फलंदाजीमुळे भारताने ५ बाद २५५ धावा केल्या. २५६ धावांचे लक्ष्य गाठताना न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत १५९ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या या ऐतिहासिक विजयाचा आनंद देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.