मुंबई : भांडुपमधील कोकणनगर परिसरात बुधवारी (दि. ०८) सकाळी रिव्हर्स घेत असताना बेस्ट बसने एका पादचाऱ्याला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात ४३ वर्षीय अतुल पडाळे जखमी झाले. त्यानंतर जखमीला बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बसने दोन पार्क केलेल्या दुचाकी तसेच एका रिक्षेला धडक दिली.
रिव्हर्स घेताना पादचारी अडकला
ही घटना सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. ओशिवरा आगारातील ए-४२५/३२ मार्गावरील बेस्ट बस कोकणनगरकडे वळत होती. प्राथमिक माहितीनुसार, बसला वळण घेता आले नाही आणि चालकाने गाडी रिव्हर्स घेतली. त्यावेळी बसने अतुल यांना धडक दिली. ते बस आणि रस्त्यालगत असलेल्या मोठ्या कुंडीमध्ये अडकले.
बचावादरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले
जखमीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी बस पुढे ढकलून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस पुढे जाऊन पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकी आणि एका रिक्षेला धडकली.
या अपघातात अतुल यांच्या दोन्ही मांडींना गंभीर दुखापत झाली असून रक्तस्रावही झाला. बसच्या वाहकाने त्यांना तातडीने मुलुंडमधील अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
घटनेची माहिती मिळताच बेस्टच्या विशेष बस निरीक्षकांसह अपघात निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. भांडुप पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे.