

मुंबईतील भांडुप परिसरात महानगर गॅस लिमिटेड (MGL) चा कर्मचारी असल्याचे भासवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीचा नागरिकांनी भांडाफोड केला आहे. संबंधित व्यक्तीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे उघड झाला प्रकार
एका स्थानिक रहिवाशाने संशयिताला ओळखल्यामुळे ही बाब समोर आली. यापूर्वीही त्याने त्याच घरात जाऊन पैशांची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित व्यक्ती पुन्हा त्याच घरात येऊन फसवणुकीचा प्रयत्न करत असताना त्याला पकडण्यात आलं.
खोटे ओळखपत्र, संशयास्पद हालचाली
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आरोपी 'Team MGL' अशी टी-शर्ट घालून बनावट ओळखपत्र घेऊन फिरताना दिसतो. चौकशीदरम्यान त्याला वैध ओळखपत्र किंवा समाधानकारक स्पष्टीकरण देता आलं नाही, त्यामुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला.
व्हायरल व्हिडिओ पाहा
पोलिसांकडून तपास सुरू
यानंतर स्थानिक नागरिकांनी त्याला भांडुप पोलिस ठाण्यात नेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं असून, तो एखाद्या मोठ्या टोळीचा भाग आहे का, याचा तपास सुरू आहे.
एमजीएलच्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढले
अलीकडे एमजीएलच्या नावावरून फसवणुकीच्या घटना वाढल्याचं समोर आलं आहे. अशा टोळ्या गॅस बिल अपडेट, मीटर तपासणी किंवा थकबाकी असल्याचे सांगून नागरिकांकडून रोख किंवा ऑनलाइन पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात. विशेषतः घरात एकटे असलेल्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मुलांना लक्ष्य केलं जातं.
नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
प्रशासन आणि एमजीएलकडून नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. कोणतीही व्यक्ती एमजीएल कर्मचारी असल्याचा दावा करत असेल, तर त्याचे अधिकृत ओळखपत्र तपासावे. एमजीएल कर्मचारी घरपोच पैसे घेत नाहीत, त्यामुळे अशा मागण्यांपासून सावध राहावे.
तसेच, बिल किंवा पेमेंटसाठी केवळ अधिकृत संकेतस्थळ किंवा अॅपचा वापर करावा. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास त्वरित सोसायटी व्यवस्थापन किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.