Mumbai : सगळेच खूश, नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी; ८०० कोटींच्या विकास निधीला स्थायी समितीची मंजुरी

आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी ८०० कोटींचा विकास निधीला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे सेनेची सत्ता असून विरोधात ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम आहे. या निधीचे वाटप समसमान पद्धतीने केले जाईल, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मात्र विरोधी पक्षाला किती निधी देणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे.
मुंबई महापालिका
मुंबई महापालिकासंग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई :  आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी ८०० कोटींचा विकास निधीला सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मात्र मुंबई महापालिकेत भाजप व शिंदे सेनेची सत्ता असून विरोधात ठाकरे सेना, काँग्रेस, मनसे, एमआयएम आहे. या निधीचे वाटप समसमान पद्धतीने केले जाईल, असा दावा स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी केला आहे. मात्र विरोधी पक्षाला किती निधी देणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे.

मुंबई महापालिकेच्या ८०,९५२.५६ कोटींच्या अर्थसंकल्पास स्थायी समितीची मंजुरी मिळाली असून ९ एप्रिलपासून सभागृहात चर्चेसाठी येणार आहे. महापालिकेच्या अर्थसंकल्पावर स्थायी समितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपली मत व्यक्त केली. यात सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील प्रकल्पाला निधी मिळण्यासाठी पत्र लिहिल्याचे प्रभाकर शिंदे यांनी सांगितले. तसेच नगरसेवकांच्या प्रभागात कुठल्या प्रकारची कामे हे तपासून निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे ही ते म्हणाले.

ज्या नगरसेवकांनी विकास निधीसाठी पत्र दिले आहे. त्याचा विचार करून त्यांना निधी दिला जाईल,असे त्यांनी सांगितले. दरम्यान, स्विकृत नगरसेवकांना ६० लाखांचा निधी मिळणार आहे.

यावेळी प्रशासनाने स्थायी समितीसाठी ८०० कोटींचा निधी दिला आहे. त्यामुळे या निधीचे वाटप कसे करायचे हे सर्वस्वी स्थायी समिती अध्यक्ष पर्यायाने सत्ताधारी भाजपा शिवसेना महायुती ठरवणार आहे.

मुंबई मनपाच्या नियमानुसार स्थायी समितीला दरवर्षी अर्थसंकल्प मंजूर करण्यापूर्वी प्रशासनामार्फत विकास निधी उपलब्ध करून दिला जातो. आतापर्यंत ५०० ते ६०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. यंदा ८०० कोटी रुपये विकास निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

विरोधकांना कमी निधी ?

मुंबई महानगरपालिकेमध्ये २०१७ ते २०२२ दरम्यान शिवसेना ठाकरे गटाची एकहाती सत्ता होती. या काळात ठाकरे गटाने भाजपाला कमी निधी दिला होता. याचा वचपा यावेळी भाजपा काढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा शिवसेना ठाकरे गटासह काँग्रेस यांना कमीत कमी निधी मिळण्याची शक्यता आहे. ३१३ कोटी रुपयापैकी जेमतेम ७० ते ८० कोटी रुपयांचा निधी ठाकरे गटासह काँग्रेस एमआयएम, समाजवादी पार्टीला मिळण्याची शक्यता आहे. महापौराना मिळणाऱ्या विकास निधीतूनही विरोधकांना कमी निधी देण्याचा भाजपा-शिवसेना महायुतीचा विचार असल्याचे समजते.

सभागृहात चर्चा

  • ९ एप्रिल सभागृहात मांडणार

  • १३ एप्रिल रोजी ठराव सूचना

  • ३० एप्रिलपर्यंत अर्थसंकल्प मंजूर होणार

'त्या' ३१३ कोटींचे काय?

प्रत्येक नगरसेवकाला एक कोटी रुपयांचा विकास निधी दिला जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईतील २२७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये विकास निधी मिळणार आहे, तर उर्वरित ४६३ कोटी रुपये निधीपैकी महापौरांसाठी १०० ते १५० कोटी रुपयांचा निधी दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निधीचे वाटप कोणाला करायचे हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा राहणार आहे. त्यामुळे स्थायी समिती अध्यक्षांकडे ३१३ कोटींचा निधी शिल्लक राहणार आहे. या ३१३ कोटी रुपयांमधून कोणत्या पक्षाला किती निधी मिळणार याबाबत बोलण्यास शिंदे यांनी नकार दिला.

logo
marathi.freepressjournal.in