

मुंबई : श्रीगणेशोत्सवासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध सेवा-सुविधांसह सुसज्ज तयारी करण्यात आली आहे. गणेश मूर्तीचे विसर्जन सुरळीत व सुरक्षित पार पडावे यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले.
डॉ. अविनाश ढाकणे यांनी रविवारी मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगरातील विविध विसर्जन स्थळांची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. यावेळी सह आयुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे, उप आयुक्त (परिमंडळ २) तथा श्रीगणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे, डी विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे, के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले, एस विभागाच्या सहाय्यक आयुक्त समरिन सय्यद आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
मुंबई शहर विभागातील गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी आदी विसर्जन स्थळांवर महानगरपालिकेने केलेली पूर्वतयारी, उपलब्ध नागरी सेवा-सुविधा तसेच गणेशभक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची डॉ. ढाकणे यांनी पाहणी केली.
स्वराज्यभूमीतील निरीक्षण मनोरे, तराफे, निर्माल्य कलश तसेच गणेश मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकांना अडथळा येऊ नये म्हणून बसविण्यात आलेल्या स्टील प्लेट आदी सुविधा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश डॉ. ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन द्यावे
विसर्जन स्थळी येणाऱ्या गणेशभक्तांना आवश्यक त्या नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देणे, विसर्जन प्रक्रिया सुरक्षित व सुरळीतपणे पार पाडणे, तसेच पर्यावरणपूरक विसर्जनाला प्रोत्साहन देणे यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करून गणेशोत्सव काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. ढाकणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.