

मुंबई : जन्म प्रमाणपत्रातील दुरुस्तीच्या नोंदींच्या पडताळणीदरम्यान आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसलेल्या किंवा अपूर्ण कागदपत्रांच्या १९७३४ नोंदी महापालिकेने स्थगित केल्या आहेत. संबंधित नागरिकांना आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी महापालिकेने ३० ऑक्टोबरपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.
महापालिकेच्या माहितीनुसार, संबंधित नागरिकांना त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावर नमूद केलेल्या पत्त्यावर पत्राद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. त्यांनी जुने जन्म प्रमाणपत्र, अर्ज आणि आवश्यक वैध कागदपत्रे संबंधित मनपा कार्यालयात सादर करायची आहेत. कागदपत्रे आणि उपलब्ध मूळ नोंदींची पडताळणी केल्यानंतर पात्र प्रकरणांमध्ये नागरी नोंदणी प्रणालीद्वारे क्यूआर कोड असलेले नवीन जन्म प्रमाणपत्र देण्यात येईल.
मूळ जन्मनोंदींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून त्या सुरक्षित ठेवण्यात आल्या आहेत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. महापालिकेच्या माहितीनुसार जन्मनोंदणीसाठी पूर्वी वापरली जाणारी एसएपी प्रणाली बंद करून सध्या सीआरएस प्रणालीद्वारे नोंदणी केली जात आहे.