मुंबई : स्थायी समितीत सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात फेरफार करत ८०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. यापैकी २२७ नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी, महापौर निधीत १५० कोटींचा निधी देण्यात आला आहे. उर्वरित निधी वाटपात विरोधकांना केवळ २० ते २५ लाखांचा निधी उपलब्ध करण्यात आला आहे, मात्र सर्वपक्षीय गटनेत्यांना दोन ते अडीच कोटींचा निधीवाटप करत त्यांना शांत करण्यात आले, तर सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना ८ ते १० कोटींचा निधी उपलब्ध करण्यात आल्याने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
मुंबई महापालिकेत २५ वर्षांनंतर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आली आहे. भाजप महायुतीची सत्ता आली असली तरी निधीवाटप समसमान होईल, असे भाजपकडून सांगण्यात आले होते. मात्र, सर्वपक्षीय गटनेत्यांना खूश करत त्यांना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याचे समजते. आपल्या प्रभागातील विकासकामे करण्यासाठी व सत्ताधाऱ्यांना अपेक्षित असलेल्या विकासकामांसाठी पालिका प्रशासनाने विविध कामांसाठी तरतूद केलेल्या निधीतून ८०० कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून तो स्थायी समितीला दिला होता. या निधीतून प्रत्येक नगरसेवकाला किमान एक कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध करण्यात आला आहे. महापौर निधी १५० कोटी रुपये, तर उर्वरित ४२३ कोटी रुपयांचा निधी सर्वपक्षीयांना समसमान वाटप करणे अपेक्षित होते, मात्र महायुतीने विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची लाखात बोळवण केल्याचे समजते.
दुसरीकडे भाजप व शिवसेना महायुतीच्या नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामांसाठी प्रत्येकी सव्वादोन कोटी रुपये विकास निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी महायुतीच्या नगरसेवकांना आपल्या विभागातील रखडलेली कामे करणे शक्य होणार आहे. तर विरोधी नगरसेवकांना २५ लाख रुपयांमध्ये विकासकामे करायची कशी, असा प्रश्न पडणार आहे.
प्रमुख नगरसेवकांना मिळालेला निधी
राजेश्री शिरवडकर - १० कोटी, भाजप
विशाखा राऊत - २५ लाख, शिवसेना ठाकरे
आश्रफ आजमी - २ कोटी, काँग्रेस
आशा काळे - २५ लाख, काँग्रेस
किशोरी पेडणेकर - २ कोटी, शिवसेना ठाकरे
यशवंत किल्लेदार - २ कोटी, मनसे
विजय उबाळे - २ कोटी, एमआयएम
डॉ. सईदा खान - ३ कोटी, राष्ट्रवादी काँग्रेस
गणेश खणकर - २० कोटी, भाजप
अमय घोले - १० कोटी, शिवसेना
प्रभाकर शिंदे - २ कोटी ५० लाख, भाजप
अजित रावराणे - २ कोटी २५ लाख, राष्ट्रवादी शरद पवार
रितू तावडे - २ कोटी २५ लाख, भाजप
सत्ताधारी गटनेत्यांनी घेतला सर्वाधिक निधी
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सभागृह नेते गणेश खणकर यांनी आपल्या प्रभागाच्या विकासासाठी तब्बल २० कोटी रुपयांचा निधी घेतला आहे, तर शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी १० कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी मात्र आपल्या प्रभागासाठी अन्य नगरसेवकांप्रमाणे सव्वादोन कोटी रुपयांचा निधी घेतला आहे. महापौर रितू तावडे यांनाही त्यांच्या प्रभागाच्या विकासासाठी सव्वादोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, तर उपमहापौर संजय घाडी यांना १० कोटींचा निधी उपलब्ध केला आहे.